बदलापूर : बदलापूर शहरात गेल्या आठवड्यापासून एक दिवसाची पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र गुरुवारपासून बदलापूर पश्चिम येथील जवळपास सर्वच भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे एक दिवस पाणी कपात, दुसऱ्या दिवशी देखभाल दुरुस्ती आणि पुढचे दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. या गढूळ पाण्याचे करायचे काय असा प्रश्न आता बदलापूरकर उपस्थित करत आहेत.

बदलापूर शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वीज आणि पाणी समस्येला सामोरे जात आहेत. बदलापूरच्या जवळपास सर्वच भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा फटका फक्त नागरिकांना वीज रूपात बसत नाही, तर विजेअभावी शहरातील पाणी उचल यंत्रणा ठप्प होते, शुद्धीकरण प्रकल्प बंद पडतो. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ जातो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उचल आणि शुद्धीकरण केले जात नाही.

परिणामी शहरातील पाण्याची मागणी आणि पुरवठा या तफावत निर्माण होते. जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. परिणामी नागरिकांमध्ये रोष वाढतो आहे. या रोषाला नियंत्रित करण्यासाठी आणि किमान सहा दिवस पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाची पाणी कपातीची घोषणा केली. त्यानुसार सध्या शहरात एक दिवस पाणी बंद ठेवले जाते आहे.

मात्र बदलापूर पश्चिम येथे बुधवारी तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामासाठी 12 तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. देखभाल दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले. मात्र गुरुवारपासून बदलापूर पश्चिमेत गढूळ पाणी पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे नागरिक संतापले आहेत. या गढूळ पाण्याचे करायचे काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कपडे धुण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. या गढूळ पाण्यामुळे पाणी शुद्ध करणारे घरगुती यंत्रही बिघडण्याची भीती आहे. त्यात या गढूळ पाण्याचा साठा घरातील टाक्यांमध्ये केल्याने त्यातही गाळ साचण्याची भीती आहे. मात्र पाण्याचा दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांना हेच पाणी साठवण्याची वेळ आली आहे. आणखी किती दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.