डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील डाॅ. राॅथ रस्ता भागातील रेल्वे जिन्यावरील चार तिकीट खिडक्यांपैकी एकच तिकीट खिडकी सकाळच्या वेळेत उघडी ठेऊन प्रवाशांना तिकिटे दिली जातात. एकच तिकीट खिडकीमुळे सकाळच्या वेळेत कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांंना रांगा लावून तिकिटे खरेदी करावी लागत आहे. सकाळच्या वेळेतील प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन या भागातील किमान तीन तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात याव्यात, अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे.

मागील काही महिन्यांपासून प्रवाशांंना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील डाॅ. राॅथ रस्ता भागातील रेल्वे जिन्यावरील तिकीट खिडकीवरील चारपैकी फक्त एक तिकीट खिडकी सकाळच्या वेळेत सुरू असल्याचे दिसते. तीन खिडक्या बंद असतात. सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी प्रवाशांची घाई असते. हे प्रवासी झटपट रेल्वे तिकीट मिळेल या अपेक्षेने रेल्वे स्थानकात येतात, पण त्यांना लांंब रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावी लागते.

डोंबिवली पूर्व भागातील पलावा, शिळफाटा, एमआयडीसी, २७ गाव आणि डोंबिवली शहर अंतर्गत भागातून प्रवासी रेल्वे स्थानकात येतात. बहुतांशी प्रवाशांकडे रेल्वे पास असला तरी कष्टकरी, मजूर आणि इतर अनेक प्रवासी रेल्वे तिकीट काढून प्रवास करत असतात. हे प्रवासी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील जिन्यावरील रेल्वे तिकीट खिडक्यांजवळ आल्यावर त्यांना अनेक दिवसांपासून सकाळच्या वेळेत चारपैकी एकच तिकीट खिडकी उघडी असल्याचे दिसले. रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागत असल्याने प्रवासी नाराज आहेत.

या रेल्वे तिकीट खिडकीजवळील स्वयंचलित रेल्वे तिकीट यंत्र सकाळच्या वेळेत बंद असतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंंबणा होते. या बंद रेल्वे तिकीट खिडक्यांविषयी प्रवाशांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. रेल्वे अधिकाऱ्यांकडील मनुष्यबळाचे कारण ऐकून प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

कोपर तिकीट खिडकी

कोपर रेल्वे स्थानकात दिवा बाजुने गेल्या दीड वर्षापूर्वी अप्पर नवे रेल्वे तिकीट घर बांधण्यात आले आहे. हे रेल्वे स्थानक बांधल्यापासून एकदाही उघडण्यात आले नाही. त्यामुळ कोपर पूर्व, पश्चिम भागातील रेल्वे प्रवाशांना डोंबिवली बाजूकडील रेल्वे तिकीट खिडकीजवळ येऊन तिकीट काढावे लागते. कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढल्याने या रेल्वे स्थानकातील गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या रेल्वे तिकीट खिडक्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानकातील बंद असलेल्या रेल्वे तिकीट खिडक्या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांना लवकरच एक निवेदन देण्यात येणार आहे. रेल्वे तिकीट खिडक्या गर्दीच्या वेळेत बंद असल्या की प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावी लागते. अनेक वेळा स्वयंचलित तिकीट यंत्र बंद असली की प्रवाशांची कुचंबणा होते. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, डोंबिवली.