ठाणे जिल्हा रेती गट विभागातर्फे केली जाणारी वाळूच्या शासकीय लिलावाची प्रकिया बंद होताच वाळू माफियांकडून मुंब्रा रेतीबंदर परिसरात मोठया प्रमाणात वाळू उपसा सुरु केल्याचे दिसून येत आहे. वाळू उपशासाठी लागणारे बार्ज, बोटी मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंब्रा रेतीबंदर परिसरात दिसून येत आहे. तर माफियांकडून खुलेआम मुंब्रा खाडीत असणाऱ्या रेल्वे पुलाखाली जोरदार वाळू उपसा केला जात आहे. सातत्याने रेल्वे पुलाखाली होणाऱ्या उपशामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तर या माफियांविरोधात महसूल विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा- कर्जासाठी बजाज फायनान्सच्या नावाने फसवणूक करणाऱ्या भामट्यांना अटक; मानपाडा पोलिसांची कामगिरी
जिल्ह्यातील रेती व्यावसायिकांनी प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या शासकीय वाळू लिलावाकडे सपशेल पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील लिलाव अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठया महसुलाला मुकावे लागत आहे. असे असतानाचा दुसरीकडे मात्र वाळू माफियांकडून जिल्ह्यातील खाडीतून अवैध वाळू उपसा करण्यास जोरादार सुरुवात केली आहे. यातही प्रामुख्याने माफियांकडून मुंब्रा खाडीत असणाऱ्या रेल्वे पुलाजवळच मोठया प्रमाणात उपसा करत आहेत. यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तर जिल्हा महसूल विभागाकडून वाळूमाफियांवर सातत्याने कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- ठाणे : लहान मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; एकास अटक
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी रेल्वे पुलाखाली अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून त्यांना मोक्का लावण्याची आदेंश संबंधित यंत्रणेला दिले होते. मात्र यानंतरही वाळू माफियांचा अवैध उपसा थांबला असल्याचे कुठेही दिसून आले नाही. तसेच मागील काही महिन्यांच्या कालावधीत जिल्हा महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी हे राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत व्यस्थ असल्याने वाळू माफियांनी त्याचा फायदा घेत मोठया प्रमाणात वाळू उपसा केल्याचे दिसून आले होते. जिल्ह्यातील खाडी आणि पात्रातून शासकीय पद्धतीने वाळू उपसा करून त्याच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मोठा महसूल प्राप्त होतो. मात्र या लिलावाकडे व्यासायिकांनी सपशेल पाठ फिरवल्याने या महसुलावर देखील जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. तर दुसरीकडे सातत्याने होणाऱ्या वाळू उपशामुळे प्रशासनाला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्या माफियांविरोधात जिल्हा महसुल विभागातर्फे कारवाई करण्यात येते. मागील आठवड्यात, महसूल विभागातर्फे नुकतीच कारवाई करून माफियांचा सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्या होता. असे असतानाही वाळू माफियांकडून पुन्हा एकदा उपसा करत असल्याचे दिसून येत आहे. तर यामागे वाळू माफियांची एक मोठी टोळी सक्रिय असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.