ठाणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. नुकतीच या प्रवेशाकरिता दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर झाली. ठाणे जिल्ह्यातून दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या ९५५ विद्यार्थ्यांपैकी २४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उद्या, दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे.बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात ११ हजार ३२२ जागांसाठी २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परंतू, निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यामुळे उर्वरित जागांसाठी प्रतिक्षा यादीतील मुलांना संधी देण्यात आली. त्यानुसार, प्रतिक्षा यादी १ मध्ये २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोन वेळा मुदत देऊन देखील त्यातील केवळ १ हजार १८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर, उर्वरित जागांसाठी ८ एप्रिल रोजी आरटीईची दुसरी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली. यात, ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी हे संदेश पाहून आपल्या पाल्याचा शालेय प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. परंतू, दुसऱ्या यादीत निवड झालेल्या ९५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ २४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाली असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उद्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची या यादीत निवड झाली आहे आणि त्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा अशी मागणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Out of 955 students selected in rte second waiting list from thane district 246 students confirmed for admission sud 02