अंबरनाथ : अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला. सध्या येथून पूर्व पश्चिम प्रवासासाठी कोणताही पूल अथवा पादचारी पूल नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भिंत उभारल्यास पूर्वेकडील भागात जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागणार आहे. त्याचा परिणाम मोरिवली गावातून शेजारच्या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, घरकामगार महिला यांना सहन आहे. त्यामुळे आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच भिंत बांधा, अशी ठाम मागणी महिलांनी केली असून त्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाला तात्पुरते माघार घ्यावी लागली.
अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा आणि बि कॅबिन परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागात आता हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्याठिकाणी घरकाम तसेच विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पश्चिमेकडून दररोज हजारो महिला घरकामासाठी या भागात येतात, तर आनंदनगर एमआयडीसीत नोकरी करणारे शेकडो पुरुष, महिला रेल्वे रुळ ओलांडूनच पूर्वेकडील भाग गाठतात. सध्या खुल्या असलेल्या या मार्गामुळे पादचाऱ्यांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. मात्र रेल्वेच्या विकास योजनेतर्गत बांधली जाणारी सुरक्षा भिंत उभारल्यास हा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल.
तब्बल ५ किलोमीटरचा फेरा
अंबरनाथ पश्चिमेतील मोरिवली येथील औद्योगिक वसाहत आणि पूर्वेतील निसर्ग ग्रीन हे गृहसंकुल हा प्रवास या रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत होतो. मात्र रस्ते मार्गाने या प्रवासासाठी २५ ते ३० मिनिटे लागतात. तर हे अंतर तब्बल पाच किलोमीटर इतके आहे. कारण हा मार्ग ओलांडण्यासाठी वाहनाने एकतर हुतात्मा चौकाजवळी उड्डाणपूल किंवा फॉरेस्ट नाक्याजवळील उड्डाणपुलावरून जावे लागेल. वाहन नसल्यास त्यासाठी रिक्षाचा अवलंब करावा लागेल आणि दिवसाला साधारण ८० रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
महिलांचा संताप, रेल्वे प्रशासनाची माघार
बुधवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने बी कॅबिन मार्गावर सुरक्षा भिंतीचे काम सुरू केले. मात्र घरकामासाठी निघालेल्या महिलांना यामुळे मोठा त्रास झाला. तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेकडो महिलांनी एकत्र येऊन कामाला विरोध दर्शवला. आम्ही हातावर पोट भरणारे आहोत. महिन्याला हजारो रुपयांचा प्रवास खर्च आमच्यासाठी परवडणारा नाही. हा मार्ग बंद झाल्यास आमच्या रोजगारावरच गदा येईल. रेल्वेने आधी पादचारी पूल बांधावा, त्यानंतरच भिंत उभारावी, अशी महिलांची ठाम भूमिका होती. शेवटी महिलांच्या संतापामुळे रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना तात्पुरते माघारी फिरावे लागले.
उड्डाणपूलाचा प्रस्ताव अजूनही रखडलेला
कल्याण-बदलापूर मार्गावरील मोरीवली नाका ते पूर्वेकडील बि कॅबिन निसर्ग ग्रीन या ठिकाणी उड्डाणपूलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा पूल झाल्यास केवळ वाहन चालकांचाच नव्हे तर पादचाऱ्यांचाही मोठा फेरा आणि खर्च वाचणार आहे. मात्र लाल फितीत अडकलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अजूनही रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.