कल्याण- येथील भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखा, नूतन विद्यालय आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे आषाढी एकादशी निमित्त शहरात दिंडी काढण्यात आली. प्लास्टिक मुक्त कल्याण शहराचा संकल्प या दिंडीच्या माध्यमातून सोडण्यात आला.कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे मागील काही वर्षापासून स्वच्छता अभियान राबविले जाते. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी प्लास्टिक मुक्त कल्याण शहराचा संदेश शहरात दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. दिंडीमध्ये विद्यार्थी, शहरातील विविध क्षेत्रातील जाणकार नागरिक सहभागी झाले होते. नूतन विद्यालय येथून दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. संतोषी माता रस्ता, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पौर्णिमा चौक, मुरबाड रस्ता मार्गे दिंडी पुन्हा नूतन विद्यालयात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि त्याचा वापर वेळीच बंद केला नाहीतर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिंडीच्या माध्यमातून शहरवासियांना देण्यात आली. वैद्यकीय संघटना कल्याण शाखा माजी अध्यक्ष आणि कल्याण डोंबिवली पालिका सदिच्छा दूत डाॅ. प्रशांत पाटील, संस्कृती मंच अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर, पालिका सचिव संजय जाधव, डाॅ. सुरेखा एकलहरे, प्रा. अशोक प्रधान, माजी नगरसेवक गणेश जाधव यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले.

हेही वाचा >>>अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

डाॅ. विकास सुरंजे आणि डाॅ. लीना सुरंजे विठ्ठल रुक्मिणीचा पेहराव करुन दिंडीत सहभागी झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. संतांच्या पेहरावातील वेशभूषा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. डाॅ. राजेंद्र लावणकर यांनी वासुदेवाचा पेहराव केला होता. विठ्ठल भक्तीच्या गजराबरोबर प्लास्टिक मुक्त कल्याण शहराचा गजर यावेळी करण्यात आला. येत्या वर्षभरात कल्याण शहर प्लास्टिक मुक्त होईल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे डाॅ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता.

हेही वाचा >>>ठाण्याच्या खाडीवर जलपर्णीचा गालीचा, पावसामुळे उल्हासनदीतील जलपर्णी वाहून आली खाडीपात्रात

मुरबाड रस्त्यावर वैद्यकीय संघटनेतर्फे मुस्लिम समाजातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय संघटना अध्यक्षा डाॅ. ईशा पानसरे, डाॅ. अमीत बोटकुंडले, डाॅ. अश्विनी कक्कर, डाॅ. सुरेखा इटकर यांनी प्रयत्न केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic free kalyan resolution by medical association in kalyan amy