डोंंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सावरकर रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीमध्ये गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी छापा मारून दारू अड्ड्यावरील सर्व साहित्य जप्त केले. ही कारवाई सुरू असताना अड्डे चालक महिलेच्या पतीने मी पोलिसाचा मुलगा आहे. तुम्ही दारू अड्ड्यावर कशी कारवाई करता, असे प्रश्न पोलिसांना केले. बेकायदाशीरपणे गावठी दारूचा अड्डा चालविणे, ग्राहकांना दारू विक्री करणे याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पूर्वेतील मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या सावरकर रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीमध्ये प्रणिता उर्फ परी मकरंद शिरसाठ ही महिला गावठी दारूचा अड्डा घरातमध्ये चालवित आहे. दारूचा साठाही घरात केलेला असतो. ही गावठी दारू विक्री करण्यासाठी परी यांनी उमेशनगरमध्ये राहणारे आपले वडील प्रवीण साटम यांना दारू विक्रीच्या अड्ड्यावर बसवलेले असते, अशी गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आंबेडकर वसाहतीमधील परी शिरसाठ यांच्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. तेथे प्रवीण साटम हे दारू विक्री करत होते. सहा ग्राहक आजुबाजुला दारू पिण्यासाठी बसले होते. या दारू अड्ड्याचा मालकी हक्क कोणाकडे आहे असे विचारल्यावर प्रवीण साटम यांनी प्रणिता उर्फ परी शिरसाठ यांचा हा गावठी दारू अड्डा असल्याचे पोलिसांना सांंगितले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घरामध्ये दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याचा हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले.

डोंबिवलीतील गावठी दारूचे अड्डे बहुतांशी झोपडपट्टी भागांमध्ये आहेत. यापूर्वी गावठी दारू मिळण्याचे ठिकाण सागाव परिसरात होते. काही जण डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे जात होते. आता शहराच्या विविध भागात हे अड्डे चोरून लपून चालविले जातात. ही दारू मलंगगड परिसरातून आणली जात असल्याची चर्चा आहे.

परी यांच्या दारू अड्ड्यावर दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांची नावे पोलिसांनी घेतली. पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर कारवाई सुरू होती. त्यावेळी तेथे परी यांचे पती मकरंद शिरसाठ आले. त्यांनी मी पोलिसाचा मुलगा आहे. तुम्ही याठिकाणी कारवाई कशी करू शकता, असे प्रश्न पोलिसांना करून पोलीस कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांसह कारवाईत अडथळा आणणाऱ्या मकरंद यांच्यावर गु्न्हा दाखल केला.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत शहरातील सर्व अवैध धंदे बंद पाडले आहेत. जेथे चोरून लपून गावठी दारू विक्री, जुगार अड्डे, अंमली पदार्थ तस्करी केली जाते. ते अड्डेही पोलिसांकडून शोधून उध्दवस्त केले जात आहेत.