ठाणे जिल्ह्य़ातील शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याची मुदत आता संपणार असल्याने ९ वी ते १२ चे वर्ग सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्य़ातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र, जिल्ह्य़ातील शाळा आणि महाविद्यालये केव्हा सुरू होणार या संदर्भात प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शाळा आणि महाविद्यालये ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्य़ातील शाळा आणि महाविद्यालये अद्यापही उघडण्यात आले नाहीत. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची मुदत येत्या दोन दिवसांत संपणार असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या सूचना जिल्ह्य़ातील शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता ठेवणे, सॅनिटायझरची फवारणी करणे यांचा या सूचनांमध्ये समावेश आहे. मात्र, जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालये केव्हा सुरू होणार यासंदर्भात अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.