बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात क्रमांक २ वर बसवण्यात आलेला स्वयंचलित जिना जुना असल्याने त्यावर स्थानिक खासदार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र या स्वयंचलित जिन्याचे २१ वर्षांचे आयुर्मान शिल्लक आहे. तो सुस्थितीत आहे. त्यामुळेच उल्हासनगरच्या फलाट क्रमांक १ वरून काढलेला हा जिना बदलापूर रेल्वे स्थानकात बसवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बदलापूरकरांच्या माथी जुना जिना का असा आक्षेप नोंदवण्यात आलेला होता.

बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले विकास काम संपलेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांनी तोंड द्यावे लागते. एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दुसरीकडे सुविधा मात्र उशिराने उपलब्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकला असलेला होम फलाट हा फलाट क्रमांक एक म्हणून बदलण्यात आला. तर फलट क्रमांक एकवर जाळी लावून तो पूर्ण फलाट क्रमांक दोन म्हणून ओळखण्यात येईल असे रेल्वेने घोषित केले. परिणामी होम फलाटाचा उपयोग बदलापूरकरांना झालाच नाही. यावरून अनेक दिवस प्रवासी संताप व्यक्त करत होते. मात्र फलाट क्रमांक दोनवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले गेले.

रेल्वे प्रशासनाने फलट क्रमांक दोनवर एकच्या बाजूला जाळी लावल्यानंतर येथे स्वयंचलित जिन्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र येथे जुना स्वयंचलित जिना लावला जात असल्याची बाब समोर आली. याबाबत स्थानिक खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदवला. तर गुरुवारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेत रेल्वे सुरक्षा दलाच्या उपस्थितीत या जिन्याची पाहणी केली. हा जिना दहा वर्षे जुना असल्याचा आक्षेप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवला. तसेच याप्रकरणी गुन्हा नोंदवला जावा, ही बदलापूरकरांची फसवणूक आहे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मात्र या जिन्याचे अजूनही २१ वर्ष आयुर्मान शिल्लक आहे. तो यापूर्वी उल्हासनगर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर २०१६ मध्ये बसवण्यात आला होता. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेच्या प्रकल्पासाठी रुळांचे रेखांकन येत असल्याने हा जिना काढण्यात आला. सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊ नये आणि तो जबाबदारीने वापरावा यासाठीच हा जिना बदलापूर स्थानकात वापरण्यात आला आहे. त्याची उत्पादक कंपनीकडून तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतरच तो बदलापुरात बसवण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच येत्या काळात बदलापूर रेल्वे स्थानकात सहा नवीन आणि स्थलांतरित दोन असे आठ स्वयंचलित जिने उभारले जाणार आहेत, अशी ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.