लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही, अशी भुमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवून काम करा, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सर्व यंत्रणांना दिले. मेट्रो स्थानक बांधकाम क्षेत्र वगळून इतर शक्य असेल ते मार्गरोधक हटवा आणि त्याचबरोबर अर्धवट अवस्थेत असलेले खोदकाम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे शहरातील रस्ते कामांबरोबरच खड्ड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीस नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, यांच्यासह मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी यांचे अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरात महापालिकेसह विविध शासकीय संस्थांकडे रस्ते आणि पुलाचे व्यवस्थापन आहे. परंतु रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आल्यावर कोणाचीही वाट पाहू नका. सर्वप्रथम नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तो रस्ता दुरुस्त केला जावा, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा दिले. रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवून काम करा, अशा सुचनाही त्यांनी केल्या. आपापल्या हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यकता असेल तिथे दुरुस्तीचे नियोजन करावे. दुरुस्ती झाल्यावर स्वतः प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. त्याचबरोबर, इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही आपापल्या रस्ते हद्दीत काटेकोर सर्वेक्षण करावे, अशा सुचनाही त्यांनी केली. ना दुरुस्त रस्त्यांबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. त्या भावना योग्यच आहेत. आपण त्याची दखल घेवून सतर्क राहायला पाहिजे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याबद्दल आपण नागरिकांच्या प्रती उत्तरदायी आहोत, याची सर्व यंत्रणांनी जाणीव ठेवावी. लोकांना त्रास होण्यापूर्वीच रस्ते दुरुस्तीची कारवाई झाली पाहिजे. सर्व यंत्रणा सजग असून तत्काळ कारवाई होत असल्याचा विश्वास नागरिकांना वाटला पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

आणखी वाचा-कोपर, ठाकुर्लीतील पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

मेट्रो मार्ग हा एकरेषीय आणि रस्त्याच्या ठराविक भागात आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावरील वाहतूकीचे नियोजन इतर रस्त्यांच्या तुलनेने सोपे आहे. मेट्रोची यंत्रणा आणि उपलब्ध साधन सामुग्री लक्षात घेता त्यांनी रस्ते दुरुस्तीचा आदर्श घालून द्यावा. इतर यंत्रणांना त्या कामाचा दाखला देऊन तसे काम करून घेता येईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मेट्रोचे काही ठिकाणी अजूनही मार्गरोधक दिसत आहेत. स्थानक बांधकाम क्षेत्र सोडून इतर ठिकाणी शक्य असेल ते सर्व मार्गरोधक हटवावे. तसेच, ज्या भागात आता खोदकाम अर्धवट आहे तिथे काम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा. पाण्याचा निचरा जलद होईल याचीही दक्षता घेतली जावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी कोल्ड मिस्क ऐवजी मास्टिक वापरावे, पावसाळा असल्याने नवीन कोणतेही खोदकाम करू नये, तसेच सगळे रस्ते वाहतूक योग्य राहतील आणि खड्डा दुरुस्त करताना नीट चौकोन आखून करावा. पेव्हर ब्लॉकचा वापर करू नका. त्यामुळे रस्त्याचा उंचसखलपणा वाढतो आणि पाणी साठून आणखी नुकसान होते, अशा सुचनाही त्यांनी केल्या. नितीन कंपनी-कॅडबरी जंक्शन उड्डाणपूल, माजिवडा उड्डाणपूल, भिवंडी – नाशिक रोड, घोडबंदर रोड, वाघबीळ येथील रस्ते स्थितीवर एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बारीक लक्ष ठेवावे. विशेष करून नाशिक रोडची दुरुस्ती तात्काळ करावी. तेथे वाहतूक कोंडी झाली की त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर होतो, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

आणखी वाचा-कल्याणमधील कासम शेख यांना मायक्रोसॉफ्टचा ‘सर्वोच्च एआय विशेषज्ञ’ म्हणून दुसऱ्यांदा सन्मान

मास्टिकचा वापर करा

ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले, तेथे चांगला परिणाम दिसला आहे. कोल्डमिक्स पद्धतीने केलेली दुरुस्ती अतिवृष्टीत टिकत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्याशिवाय, मास्टिक हे कोल्डमिक्सपेक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांनीही मास्टिकचा पर्याय वापरावा आणि रस्त्यावरील खड्डे १२ तासांच्या आत बुजवावेत, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remove other roadblocks except metro station construction area mrj