ठाणे : शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम गेले काही दिवस सुरू असून या कामादरम्यान, नाट्यगृहातील जुन्या खुर्च्या काढून त्याठिकाणी नवीन एैसपैस खुर्च्या बसविल्या जाणार असल्याने आसन क्षमता ५० ते ६० खुर्च्यांनी कमी होणार आहे. तसेच ४७ वर्षांपुर्वी व्यासपीठावर बसविण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात येणार असला तरी नव्या पडद्यावर जुन्या नक्षीकामाची झलक दिसून येणार आहे. याशिवाय, नाट्यगृहाच्या बाहेरील बाजून बसविण्यात येणाऱ्या उदवाहकातील काचेतून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय दृश्य पाहता येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. १९८० मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाले होते. काही वर्षांपुर्वी गडकरी रंगायतन नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली होती. त्यावेळेस नाट्यगृहातील खुर्च्या बदलणे, बैठक कक्ष नुतनीकरण अशी कोणतीच कामे करण्यात आली नव्हती. आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पुन्हा हाती घेतले असून या कामामुळे नाट्यगृह कार्यक्रमांसाठी बंद आहे. या कामासाठी राज्य शासनाने २३ कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली, तेव्हापासून खुर्च्या बदलण्यात आल्या नव्हत्या. नादुरुस्त खुर्च्या दुरुस्त करण्याची कामे आतापर्यंत करण्यात आली. या खुर्च्या कालबाह्य झाल्या असून त्याचबरोबर अनेक तुटलेल्या खुर्च्या बदलणे शक्य नाही, त्यामुळे नवीन खुर्च्या बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाट्यगृहात १ हजार १७ व्यक्ती बसू शकतील, इतकी आसन क्षमता आहे. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि एैसपैस नाहीत. आता याठिकाणी नवीन एैसपैस खुर्च्या बसविल्या जाणार असल्यामुळे आसन क्षमता ५० ते ६० खुर्च्यांनी कमी होणार आहे.

या नाट्यगृहामध्ये नाटकांचे प्रयोग तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही नाट्यगृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून येते. त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. नाट्यगृहात जाण्यासाठी प्रेक्षकांना जिने चढावे लागतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना जिने चढ-उतार करणे शक्य होत नाही. त्यांची दमछाक होते. ही बाब ठाणे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली असून या पार्श्वभूमीवर रंगायतनमध्ये उदवाहक बसविण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूने ही उदवाहक बसविली जाणार आहे. या उदवाहकातून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय दृश्य पाहता येणार आहे. याशिवाय, नाट्यगृहाच्या आवारत शौचालयाची व्यवस्था होती. त्यासाठी एक मजला नागरिकांना चढून जावे लागत होते. त्यामुळे आता तळमजल्यावरही शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे येथे कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. या वृत्तास ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दुजोरा दिला आहे.

नवीन पडदा

नाट्यगृहाची उभारणी १९८० मध्ये करण्यात आली. त्यावेळी नाट्यगृहाच्या व्यासपीठासमोरील पडद्या बसविण्यात आला होता. त्यावर हाताने नक्षीकाम करण्यात आले आहे. नंदा चारी यांनी हा पडदा तयार केला होता. नाट्यगृहाचे आकर्षण असलेला हा पडदा जुना व जीर्ण झाला आहे. त्यामुळे या पडद्याचे जतन करण्याबरोबरच तशाचपद्धतीचा नवीन पडदा तयार करून तो बसविण्यात येणार आहे. नंदा चारी यांच्याकडूनच हा पडदा तयार करून घेतला जाणार आहे. जुना पडद्यासाठी त्यावेळी २२ हजार रुपये खर्च झाले होते. नवीन पडद्यासाठी २२ लाख रुपये खर्च होणार आहेत, अशी माहीत सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation of ram ganesh gadkari rangayatan theatre is underway reduced seating capacity by 50 60 chairs sud 02