डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे या कार्यालयातील फ आणि ग प्रभाग कार्यालयांचे पालिकेच्या इतर जागांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. ग प्रभाग कार्यालय ध. ना. चौधरी विद्यालय भागातील सुनीलनगरमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांना विविध कामांसाठी या कार्यालयात फेऱ्या मारताना त्रास होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ प्रभाग कार्यालय रेल्वे स्थानकाजवळील पी. पी. चेंबर्स मॉल या पालिकेच्या सर्वसमावेशक आरक्षणात मिळालेल्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. रेल्वे स्थानकाजवळ मध्यवर्ति ठिकाणी हे कार्यालय असल्याने लोकांची सोय होते. रामनगर, राजाजी पथ, म्हात्रेनगर, दत्तनगर, आयरे भागातील रहिवाशांना सुनीलनगरमध्ये स्थलांतरित ग प्रभागात जाण्यासाठी रिक्षा वेळेवर मिळत नाही. रिक्षा चालकाने येण्याची तयारी दर्शविली तर तो ६० ते ७० रुपये एका फेरीचे भाडे सांगतो. कार्यालयात गेल्यावर तेथे कर्मचारी, साहेब जागेवर असतोच असे नाही. ग प्रभाग कार्यालय आडबाजुला गेल्यापासून अनेक कर्मचारी बाहेरील कामाच्या नावाखाली कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे ६० ते ७० रुपयांचा प्रवास खर्च फुकट जातो, असे तक्रारदारांनी सांगितले.

काम नाही झाले तर मनस्ताप सहन करावा लागतो –

मालमत्ता, पाणी देयक भरणा, सोसायटीची सदनिका हस्तांतरण, कर लावून घेणे ही बहुतांशी कामे घरातील ज्येष्ठ नागरिक मंडळी करतात. ग प्रभाग हद्दीतील अनेक रहिवासी कर भरणा, मालमत्ता, पाणी देयकातील चुका दुरुस्तीसाठी सुनीलनगर मधील कार्यालयात जातात. तेथे कर्मचाऱ्यांनी लिखित पध्दतीने काही कामे केली की रहिवाशांना तेथून रेल्वे स्थानकाजवळील पालिकेच्या जुन्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळ नागरी सुविधा केंद्रात पाठविले जाते. या धावपळीत ज्येष्ठ नागरिक, रहिवाशांना रिक्षा खर्च, काम नाही झाले तर मनस्ताप सहन करावा लागतो.

डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ ग प्रभाग कार्यालय यापूर्वी असल्याने नोकरदार वर्गातील महिला, पुरूष मुंबई, ठाण्यात कार्यालयात जात असतानाच वाटेवर असलेल्या ग प्रभाग कार्यालयात जाऊन आपली घरगुती कामे करुन घेत होते. या नोकरदावर वर्गाची ग प्रभाग कार्यालय आडबाजुला स्थलांतरित झाल्याने गैरसोय झाली आहे. नोकरदार वर्गाला आपले काम करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी सुट्टीच घ्यावी लागते. यापूर्वी ग प्रभाग कार्यालय रेल्वे स्थानकाजवळ असल्याने येता जाता काम उरकून घेता येत होते, असे नोकरदारांनी सांगितले.

निर्णय घेणारे बहुतांशी अधिकारी प्रतिनियुक्तीवरील –

ग प्रभाग कायार्लय सुनीलनगररमध्ये स्थलांतरित करण्याऐवजी लोकांचा विचार करून हे कार्यालय चार रस्त्यावरील जगन्नाथ प्लाझा (कॉमर्स प्लाझा- साहित्य संमेलनाचे कार्यालय) जागेत, बालभवनमध्ये तळ मजल्याला, किंवा रेल्वे स्थानकालगतच्या पालिकेच्या अखत्यारित असलेल्या जागेत स्थलांतरित करणे आवश्यक होते, अशा सूचना काही माजी नगरसेवकांनी केल्या. आता पालिकेत नगरसेवक राजवट नसल्याने प्रशासन मनमानी करून निर्णय घेते. निर्णय घेणारे बहुतांशी अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आणि त्यांना स्थानिक पातळीवर लोकांना काय त्रास होतो याची जाणीव नसल्याने ते मनमानी करून निर्णय घेत आहेत, असे काही माजी नगरसेवकांनी सांगितले.

रहिवाशांनी एकत्रितपणे आयुक्तांची भेट घ्यावी –

‘सुनीलनगरमधील ग प्रभागाचे कार्यालय रेल्वे स्थानक भागातील स्थलांतरित करावे, अशी ग प्रभाग हद्दीतील अनेक रहिवाशांची मागणी आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यालय स्थलांतरित केले आहे. त्यात आता पुन्हा बदल करणे स्थानिक पातळीवर शक्य नाही. काही रहिवाशांनी एकत्रितपणे आयुक्तांची भेट घेऊन त्यांना ग प्रभाग कार्यालय स्थलांतराविषयी बोलावे,’ असे एका पालिका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents are suffering due to relocation of g ward office of dombivali municipality msr
First published on: 30-06-2022 at 13:24 IST