डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागात रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. इमारती, रुग्णालये, कंपन्यांच्या चारही बाजुने ही कामे सुरू असल्याने सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत धुळीचे लोट परिसरात पसरत असल्याने या भागातील रहिवासी, उद्योजक, शाळा चालक, रुग्णालय चालक हैराण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्ते खोदकाम, काँक्रिटीकरणाचे काम, बाजुच्या कच्च्या रस्त्यांवरुन वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे कधीही पाहिली नाही एवढी धूळ सकाळपासून उडत असते. घराच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तर घरात कपडे, भांडी, लादीवर धुळीचा थर साचतो, असे रहिवाशांनी सांगितले. घरातील प्रत्येक रहिवासी सर्दी खोकल्याने हैराण आहेत. ज्येष्ठ नागरिक, वृध्द, बालकांनाही धुळीचा त्रास होत आहे. दमा विकाराचे रुग्ण धुळीच्या उधळयाने सर्वाधिक हैराण आहेत.

हेही वाचा >>> ‘साहेब मी गद्दार नाही, ४० गद्दारांना…’ कल्याणमध्ये ‘त्या’ फलकावरुन खळबळ, पालिका आणि पोलिसांनी तात्काळ फलक हटविला

रुग्णालय चालक सतत धुळीचे लोट पसरत असल्याने हैराण आहेत. रुग्णालयाची मुख्य प्रवेशव्दार रुग्ण खोलीचे दरवाजे बंद ठेऊन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. धुळीमुळे रुग्णांना त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जात आहे, असे रुग्णालय चालकांनी सांगितले. रस्ते कामे प्राधान्याने होणे गरजेचे असल्याने याविषयी आता बोलून उपयोग नाही, असे या भागातील उद्योजक, रहिवाशांनी सांगितले. एमआयडीसीतील शाळा चालकांनीही पावसाळ्यापूर्वी रस्ते कामे पूर्ण झाली पाहिजेत असी मागणी केली आहे. ही कामे रेंगाळली तर वाहन कोंडी बरोबर चिखल, मातीतून शाळेच्या बस घेऊन जाव्या लागतील अशी भीती व्यक्त केली.

हेही वाचा >>> ठाणे : मीनाताई उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू

एमआयडीसीतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून नानासाहेब धर्माधिकारी रस्ता ओळखला जातो. आर. आर. रुग्णालय, कावेरी स्वीट ते ओंकार शाळा भागात काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बंगले, सोसायट्या आहेत. एका बाजुला काँक्रिटीकरणाचे काम तर दुसऱ्या बाजुने वाहनांची वर्दळ या भागात सुरू आहे. हा सगळा धुरळा परिसरातील बंगले, सोसायट्यांमध्ये जातो. अभिनव शाळा, सुपर कास्टिंग कंपनी भागात एमएमआरडीएतर्फे रस्ते कामे सुरू आहेत. ११० कोटीची कामे निवासी आणि औद्योगिक विभागात सुरू करण्यात आली आहेत. ही कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, अशी रहिवाशांची मागणी आहे.

रस्ते दोन फूट उंच

एमआयडीसीतील काँक्रिटच्या रस्त्यांची बांधणी करताना जुने डांबरीकरणाचे रस्ते किमान दोन फूट खोल खोदून त्यावर नव्याने थर टाकून काँक्रिट रस्त्यांची बांधणी होणे आवश्यक होते. परंतु, ठेकेदाराने आठ ते दहा इंच खोल खोदून त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे, असे रस्ते बांधणी क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. या उंच रस्त्यांमुळे आजुबाजुच्या बंगले, इमारतीच्या आवारातील पावसाचे पाणी कसे आणि कोठे वाहून जाणार. रस्त्याच्या समांतर गटाराची उंची केली तर गटारे दोन फूट उंच होणार आहेत आणि सोसायट्या आणि बंगल्यांची उंची जमिनीलगत दोन फूट खाली आहे. त्यामुळे किरकोळ पाऊस पडला तरी यापुढील काळात एमआयडीसी जलमय होण्याची भीती एका रस्ते बांधणी क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले.

रस्ते बांधणीच्या कामाविषयी खासदार, आमदार यांना सांगून झाले आहे पण ठेकेदाराच्या कामात कोणताही बदल झाला नसल्याने एमआयडीसीतील रहिवासी नाराज आहेत.

“ एमआयडीसीतील समतल भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन जुने रस्ते किमान दोन फूट खोदून मग त्यावर काँक्रिट कामे करणे गरजेचे होते. तसे काही करण्यात आले नाही. त्यामुळे सोसायट्या खाली आणि रस्ते वरती अशी परिस्थिती झाली आहे. पावसाळ्यात यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होईल.”

विक्रम अरोरा, एमआयडीसी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents of dombivli midc entrepreneurs disturbed by dust ysh