डोंबिवली : डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांमध्ये पैशाच्या विषयावरून वाद होता. या वादातून एका रिक्षा चालकाने रविवारी दुपारी दुसऱ्या रिक्षा चालकावर नांदिवली नाला भागातील एका बिअर बारच्या बाहेर धारदार चाकुने वार करून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मानपाडा पोलीस ठाण्यात या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम दामु जाधव (५३) असे गंभीर जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भोपर भागात गणेशदर्शन काॅलनी भागात कुटुंबीयांसह राहतात.. सुदाम यांच्यावर हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव मनोज देवानंद नाटेकर (३६) आहे. ते भोपर नांदिवली गावातील वर्गीस म्हात्रे चाळीत कुटुंबीयांसह राहत होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, मानपाडा पोलिसांनी तात्काळ हालचाली करून हल्लेखोर रिक्षा चालक मनोज नाटेकर यांना अटक केली आहे. ही हल्ल्याची घटना नांदिवली तर्फ भागातील नाल्याच्या बाजुला असलेल्या लक्ष्मीकांत बारच्या (बितुल बार) समोर घडली आहे. पोलिसांनी नाटेकर विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की रविवार असल्यामुळे सुदाम जाधव आणि त्यांचा एक मित्र रविवारी दुपारी नांदिवली पंचानद येथील नाल्याच्या बाजुला असलेल्या लक्ष्मीकांत बारमध्ये (बितुल बार) मेजवानी करण्यास बसले होते. एक ते दीड तासानंतर त्यांचे बारमधील भोजन, मेजवानी आटोपल्यानंतर सुदाम जाधव आपल्या मित्रासह बारबाहेर पडले.
बारच्या बाहेर पडल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले असतानाच अचानक त्यांच्या समोरून त्यांच्या परिचयाचा मनोज नाटेकर हा हातात धारदार चाकू घेऊन आला. त्याने सुदाम जाधव यांना काही कळू न देता किंवा बचावाची कोणतीही संधी न देता सुदाम यांच्या छातीवर, हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात सुदाम रक्तस्त्राव होऊन जमिनीवर कोसळले.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ हालचाल करून सुदाम जाधव यांना रुग्णालयात नेले. येथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मानपाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारेकरी मनोज नाटेकर यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना शिताफीने अटक केली. पैशाच्या देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याची चर्चा आहे.तपासातून या प्रकरणातील वस्तुस्थिती बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार याप्रकरणाचा तपास करत आहेत.