ठाणे – वागळे इस्टेट भागातील कामगार नाका परिसरात मागील काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत अडकून राहण्यापेक्षा रिक्षा चालक सायंकाळी लवकर रिक्षा बंद करत आहेत. परिणामी, स्थानक परिसरात लोकमान्य, यशोधन नगर परिसराकडे येणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या वेळी रिक्षांचा तुटवडा भासू लागला आहे.

गावदेवी परिसरातील लोकमान्यनगरच्या रिक्षा थांब्यावर नागरिकांची भल्ली मोठी रांग लागत आहे. अर्धा ते पाऊण तास प्रवाशांना या रांगेत रिक्षाची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. तसेच रांगेत रिक्षा मिळवताना, प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग देखील निर्माण होत आहेत.

ठाणे स्थानकातील गावदेवी परिसरात लोकमान्यनगर, इंदिरा नगर, नितीन कंपनी, ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर या भागात जाणाऱ्या शेअर रिक्षांचे थांबे आहेत. या परिसरातील इतर थांबे सोडल्यास लोकमान्य नगर येथील थांब्यावर गेल्या काही दिवसांपासून अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीने प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत आहेत. तोपर्यंत प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. अनेकदा रिक्षा मिळण्यास एक तास देखील उलटून जात असल्याचे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.

गावदेवी येथून लोकमान्यनगरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षा महापालिका मुख्यालय, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका मार्गे वाहतूक करतात. परंतू, गेल्या काही दिवसांपासून कामगार रुग्णालय ते कामगार नाका आणि सावरकन नगर ते कामगार रुग्णालय अशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत रिक्षा अडकून पडत आहेत. या कोंडीत अडकून राहण्यापेक्षा अनेक रिक्षा चालक सायंकाळच्यावेळी रिक्षा बंद ठेवणे पसंत करत आहेत. त्यामुळे स्थानक परिसरात सायंकाळच्या वेळी रिक्षाचा तुटवडा भासू लागला आहे. आधीच दिवसभर कामाच्या तणावामुळे थकवा आलेला असतो आणि त्यात रिक्षांची वाट पाहात उभे रहावे लागत. यातही रिक्षा मिळवताना प्रवाशांमध्ये आपापसात वादाचे प्रसंग देखील निर्माण होतात, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

शेअर रिक्षाच्या दरात वाढ

यशोधन ते गावदेवी या मार्गावरील प्रतिप्रवासी भाडे १५ तारखेपासून २० रुपयावरुन २५ रुपये आकारले जात आहे. ही भाडेवाढ अधिकृत असल्याची प्रतिक्रिया रिक्षा संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

रिक्षा चालक प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी रिक्षा मीटरच्या दरात वाढ झाली. परंतू, शेअरिंग रिक्षाचे दर वाढवले नव्हते. गावदेवी ते लोकमान्य नगर पर्यंत प्रति प्रवासी २० रुपये दर आकारण्यात येत होते. गेले काही दिवसांपासून कामगार नाका जवळ होत असलेल्या वाहतूक कोंडीमध्ये रिक्षा अडकतात. यात, आमचा वेळ आणि इंधन खर्च होत, हे आम्हाला परवडणारे नाही. म्हणून, आम्ही सायंकाळी रिक्षा लवकर बंद करतो किंवा गावदेवी ते नितीन कंपनी किंवा ज्ञानेश्वर नगर या मार्गावर प्रवासी वाहतूक करतो, असे एका रिक्षा चालकाने सांगितले.