कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या कल्याण जवळील आंबिवली वस्तीमधील सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी या कुख्यात गुन्हेगाराला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी चित्रपटातील थराराप्रमाणे इराणी वस्तीमधून अटक केली. त्याच्या अटकेनंतर इराणी वस्तीमधील महिलांनी नेहमीप्रमाणे झुंडीने पुढे येत सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना न जुमानता सलमानचा ताबा घेतला.सलमानच्या अटकेचा हा थरार इराणी वस्ती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सलमानवर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंबई, बदलापूर, मिरा भाईंदर, वसई, विरार, नवी मुंबई, पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १५ हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पनवेल येथे काही दिवसापूर्वी सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीमधील रहिवासी असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली होती. पनवेल पोलिसांजवळ तेथील चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण होते. ते चित्रण पनवेल पोलिसांनी खडकपाडा पोलिसांना दाखवले. त्यावेळी चित्रणातील इसम हा आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील सलमान जाफरी असल्याचे स्पष्ट झाले.
खडकपाडा पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस इराणी वस्तीमध्ये सलमान जाफरीवर पाळत ठेऊन होते. तो घराबाहेर पडून फिरत असतानाच आपण तुला पाहिलेच नाही असा अविर्भाव करत पाळतीवर असलेल्या पोलिसांनी सलमानवर झडप घालून त्याला अटक केली. सलमानला पकडताच इराणी वस्तीमधील महिला सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून आल्या. त्या सलमानला सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होता. सलमानला सोडा अशी त्यांची आग्रही मागणी होती. पोलिसांनी सलमान भोवती घट्ट पकड केली होती. त्यामुळे इराणी महिला सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडवू शकल्या नाहीत.
सलमानला पोलीस वाहनात बसून खडकपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तरीही वस्तीमधील काही महिलांनी पोलीस वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सलमानला अधिकच्या चौकशीसाठी पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात सोनसाखळ्या, इतर चोऱ्या करणारे बहुतांशी चोरटे हे इराणी आणि शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील इसम असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक मारूती आंधळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, उपनिरीक्षक विजय भालेराव, हवालदार राजू लोखंडे, योगेश बुधकर, महेश बगाड, ललित शिंदे, संदीप भोईर, सुरज खंडाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.