उल्हासनगर : पर्यावरण संरक्षण, ध्वनी प्रदूषणविरोधी लढा देणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकील सरिता खानचंदानी (५१) यांनी २८ ऑगस्ट रोजी उल्हासनगर ४ येथील रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवत पाच जणांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आली.
उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पुरुषोत्तम खानचंदानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरिता खानचंदानी यांचा त्यांच्या ओळखीतील जिया गोपलाणी व इतरांनी वारंवार मानसिक छळ केला होता. आत्महत्येपूर्वी सरितांनी आपल्या कॅबिनमध्ये लिहून ठेवलेल्या चिट्ठीत जिया गोपलाणी, उल्हास फाळके, शिवाणी शुक्ला फाळके, राज चांदवाणी आणि धनंजय बोडारे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती प्रथम खबर अहवाल अर्थात दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहे.
२७ ऑगस्टच्या रात्री सरिता खानचंदानी यांचा वाद झाला होता. त्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर २८ ऑगस्टच्या सकाळी त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःचे म्हणणे देण्याची तयारी दाखवली होती. पण त्याच दिवशी दुपारी त्यांनी इमारतीवरून उडी घेतली, असे त्यांच्या पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी म्हटले आहे.
सरिता खानचंदानी या वकील व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून राज्यभर परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूने उल्हासनगरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर पुरुषोत्तम खानचंदानी यांच्या तक्रारीनुसार पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने खुलासा
उल्हासनगर शहरातील समाज माध्यमांवर २७ ऑगस्टच्या मध्यरात्री अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. त्यात सरिता खानचंदानी यांचा जिया गोपलाणी यांच्याशी वाद सुरू असल्याचे दिसत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सरिता खानचंदानी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गेल्या. तेथून त्या परत आल्यानंतर त्यांनी इमारतीवरून उडी घेतली. त्यांचे पती वकील पुरुषोत्तम खानचंदानी यांनी केलेल्या पाहणीत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या काहीतरी लिहित असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी शोध घेतला असता सरिता खानचंदानी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले.
चिठ्ठीत नेमके काय
सरिता खानचंदानी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांच्या हस्ताक्षरात इंग्रजी भाषेमध्ये Jiya Goplani, Ulhas falke, Dhananjay Bodare, Shivani Shukla, Adv. Raj Chandwani are responsible for my death. I have not done any wrong. I have not taken any money. I have not done injustice to Jiya Goplani. I have not taken single rupee from any Mandal, any neta. Jiya Goplani & Ulhas falke are framing me false above mentioned have mentally tortured to reach level to give my life” असे लिहल्याचे दिसुन आले, असे दाखल गुन्ह्यात पुरुषोत्तम खानचंदानी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.