कल्याण – मागील पाच वर्षापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेला रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटिस) गतीने पूर्ण करण्यात यावा. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे लवकरात लवकर दूर करावेत. यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी या प्रकल्पाची दोन तास पायी पाहणी केली. या पाहणीनंतर येत्या डिसेंबर ते एप्रिलपर्यंत सॅटिस प्रकल्पासह या भागातील उड्डाण पूल टप्प्याने खुले होतील, असा निष्कर्ष या पाहणीनंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी काढला.

या पाहणीच्यावेळी आयुक्त गोयल यांच्या सोबत या प्रकल्पाच्या प्रमुख कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि इतर पालिका, ठेकेदाराचे सल्लागार, अभियंते उपस्थित होते. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक हे सर्वाधिक प्रवासी वर्दळीचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकालगतच्या वाहतुकीत सुसुत्रता आणावी म्हणून गेल्या सात वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानक वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित केले. या प्रकल्पासाठी ४९८ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला. शासनाचे या प्रकल्पासाठी साहाय्य मिळाले.

सन २०२१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प सन २०२३ मध्ये पूर्ण करण्याची मुदत होती. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, रेल्वेच्या जागा, हाॅटेलची बांधकामे आल्याने त्यांचे विषय मार्गी लागेपर्यंत त्या भागाची कामे बंद ठेवावी लागली. त्यामुळे प्रकल्प कामाला विलंब झाला. रेल्वे स्थानक भागात प्रवाशांना एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ प्रवासी पादचारी मार्गिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शहराच्या बाहेरून येणारी वाहने रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत अशा पध्दतीने उड्डाण पुलावरून परस्पर निघून जावीत, अशा पध्दतीने मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक ते बैलबाजार चौक दरम्यान १६३० मीटरचा उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलामधील १३४६ मीटरचे काम पूर्ण झाले आहे, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

आयुक्त गोयल स्वता कसलेले अभियंते असल्याने त्यांनी पूल, सॅटिस प्रकल्प उभारणीतील बारकावे, त्रृटींवर बोट ठेऊन या त्रृटी दूर करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला केल्या. सॅटिस प्रकल्प आणि पूल उभारणीची कामे पूर्ण होत नसल्याने गेल्या पाच वर्षापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर दररोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक को्ंडीत असतो. या कोंडीचा विचार करून हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

रेल्वे स्थानकातून बाहेर येणारा प्रवासी थेट बस आगारातील बस थांंबा, रिक्षा, दुचाकी वाहनतळांवर उन्नत मार्गिकेतून जाणार आहे. या प्रकल्पांमुळे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील भविष्यकालीन वाहन कोंडीचे संकट कायमस्वरूपी दूर होणार आहे. विलंब आणि वाढत्या प्रकल्प खर्चामुळे या प्रकल्पाची आताची किंमत ६०२ कोटी आहे. या प्रकल्पासाठी शासनाने पालिकेला २४२ कोटीचा वाढीव निधी दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील सॅटिस प्रकल्प, उड्डाण पूल कामात भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन अडथळे होते. यामधील बहुतांशी अडथळे दूर झालेत. डिसेंबर ते एप्रिलपर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने नागरिकांसाठी टप्प्याने खुला होईल. हा प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना आहेत. – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता.