कल्याण : कल्याण पश्चिमेत बिर्ला महाविद्यालयाजवळ बुधवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली येऊन दुचाकीवरील एक तरूण चिरडला गेला. या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण बिर्ला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. अमनकुमार दुबे (१७) असे बस अपघातात मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर अमनकुमार दुबे महाविद्यालयातून बाहेर पडला. तो दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. बिर्ला महाविद्यालयासमोरील रस्ता मुंबई-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावरील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून जात असताना अमनकुमार दुबे एका एसटी बसच्या समांतर दुचाकी चालवित होता.
बस चालक त्याच्या वेगात बस पुढे नेत होता. अचानक अमनकुमार दुबे दुचाकीसह तोल जाऊन बसच्या मागच्या चाकाखाली आला. त्याचा तोल जाऊन तो पडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकीवरून तरुण बसच्या मागच्या चाकाखाली येताच इतर वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी ओरडा केला. घटना घडताच चालकाने जागीच बस थांबवली. मागच्या चाकाखाली आल्याने अमनकुमार दुबेची गंभीर स्थितीत होता. त्याला तातडीने या रस्त्यावरील गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात नेले. नंतर त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. एसटी बस राजगुरूनगर बस आगाराची होती. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातानंतर बिर्ला महाविद्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सर्व प्रकारची वाहने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर अडकून पडली. स्थानिक पोलीस येऊन पंचनामा झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना या भागातील कोंडी सोडवली.
© The Indian Express (P) Ltd