Renovation of Ram Ganesh Gadkari Rangayatan Theatre in thane : ठाणे : ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या वास्तुचे नुतनीकरण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात या कामाची पाहाणी ज्येष्ठ कलाकार, अभिनेते, निर्मात्यांनी करत नुतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले होते. त्यासोबतच एक इच्छाही व्यक्त केली होती. ती इच्छा आता स्वातंत्र्यदिनी पुर्ण होणार आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. १९८० मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाले होते. यामुळे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे कामही सुरू केले. या कामासाठी राज्य शासनाने पालिकेला निधीही दिला होता. गेले सात महिने हे नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद आहे.

या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असताना म्हणजेच, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

ही इच्छा व्यक्त केली होती

गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी उदवाहकाची व्यवस्था करण्यात आली असून हा निर्णय स्तुत्य असल्याचे म्हटले होते. त्यासोबत, रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करावी, अशी सूचना पाहणीदरम्यान करण्यात आली होती. तसेच, पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकिट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा यांचीही पाहणी केली होती. तसेच नुतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले होते. तसेच लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

स्वातंत्र्यदिनी पुर्ण होणार इच्छा ठाणे शहरामध्ये ४५ वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. नाट्यगृहात बसविण्यात आलेली विद्युत यंत्रणेची तसेच ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या पातळीची तपासणी करण्यात आली आहे. हे नाट्यगृह स्वांतत्र्यदिनी खुले करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे या रंगमंचावर प्रयोग करण्याची मराठी अभिनेते आणि निर्मात्यांची इच्छा पुर्ण होणार आहे.