ठाणे – सहजरित्या ज्ञान मिळत नाही, त्यासाठी श्रम करावे लागतात. त्याचबरोबर एखादे साहित्य समजून घ्यायचे असेल तर त्या लेखकाशी थेट संपर्क साधता आला पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी ग – गप्पांच्या कार्यक्रमात महाभारत, रामायण तसेच विविध विषयांवर बोलत असताना व्यक्त केले.

ग – गप्पांचा या संस्थेच्यावतीने ग – गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाभारत, रामायण तसेच विविध विषयांवर दाजी पणशीकर यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम ज्ञानराज सभागृह, ठाणे येथे पार पडला. पुढे ते म्हणाले की, घरच्याच पाठशाळेत पहिले गुरू पिता यांच्याकडून वेदाध्यायमृत आणि संस्कृतचा अभ्यास केला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ग्रंथ, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, एकनाथांची ग्रंथ संपदा, तुकारामांची गाथा आदी संतवाङ्मयाचा अभ्यास करताना जीवनात आमूलाग्र बदल होत गेले. यातूनच जगण्याचा मार्ग सापडला असे त्यांनी सांगितले.

पुण्यात गेल्यानंतर अपघाताने ‘एकनाथी भागवत’ ग्रंथावर काम मिळाले आणि त्यातूनच भावार्थ रामायणावरही काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात मी दोन वर्षे रामाची सेवा देखील केली. त्यानंतर आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ वृत्तपत्रात कर्णाच्या नकारात्मक बाजूवर लेखन करताना अनेक अडचणी आल्या, परंतु परशुरामावर लेखन करताना आलेल्या अडथळ्यांवर मात करत सन्मानपूर्वक पुढे वाटचाल केली, असे त्यांनी सांगितले.

महाभारताचा नायक मानव आहे आणि खलनायक कर्ण आहे. द्रौपदेची विलंबना कर्णामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सहजरित्या ज्ञान मिळत नाही, त्यासाठी श्रम करावे लागतात. मी एका रात्रीत ८० पाने लिहिली आहेत आणि दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लेखन केले आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पणशीकरांनी ज्ञानेश्वरीचा चौथा आणि चौदावा अध्याय एम.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकविल्याचा अनुभव देखील सांगितला. ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरांशीच संवाद साधावा लागतो, अगदी सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानासारखे. शब्दांविना होणारा संवादही चालतो, पण त्या त्या लेखकाच्या जाणिवेशी एकरूप होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एखादे साहित्य समजून घ्यायचे असेल तर त्या लेखकाशी थेट संपर्क साधता आला पाहिजे असे मत व्यक्त केले. व्याख्यानादरम्यान त्यांनी साहित्यसेवेच्या अनुभवांबाबतही मत मांडले. तुमची पात्रता वाढल्यानंतर प्रकाशक स्वतःहून शोधायला येतात. आपण स्वतःला कधीही विकू नये, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.