ठाणे: ठाणे बाजारपेठेतील महात्मा फुले मंडईमधील मसाला बाजारातील सात मसाला गिरण्या ठाणे महाालिकेने सील केल्या आहेत. या गिरण्यांसाठी बनविण्यात आलेल्या मोठ्या यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे बाजारपेठेत महात्मा फुले मंडईमध्ये मसाला बाजार आहे. ठाणे तसेच विविध भागातून या मसाला बाजारात नागरिक मसाला खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजारात मोठ्याप्रमाणात मसाला गिरण्या सुरु असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असते. याबाबत स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, साहाय्यक आयुक्त (स्थावर विभाग) राजेश सोनावणे, नौपाडा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी या मसाला गिरण्यांची पाहणी केली.

या गिरण्यांमध्ये मोठी यंत्र-सामुग्री असल्याने या गिरण्या मंडईऐवजी औद्योगिक क्षेत्रात असायला हव्यात. या यंत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत होते. सुमारे १०० डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी येथे नोंदवण्यात आली.

त्यांना मार्च महिन्यामध्ये ध्वनी प्रदूषणाबाबतची नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही या गिरण्या सुरूच होत्या. त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे पालन करत नसल्याने त्या सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.