ठाणे : दहीहंडी निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये राजकीय काला निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाक्याच्या दहीहंडी विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्यानुसार शिंदे गटाने नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये ठाण्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दहीहंडी निमित्त कल्याणमधील वाहतुकीत बदल

ठाण्यातील टेंभीनाका येथे शिंदे गटाकडून ‘दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंडीचे आयोजन करण्यात येत असते. तर, टेंभीनाका येथून अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरावरील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. गर्दीला आकर्षित करण्यासाठी दोन्ही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खासदार राजन विचारे यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हंडीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. मंगळवारी रात्री शिंदे गटाने नौपाडा पोलीस ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले. तर बुधवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रकारामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्षाची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group demand to file case against mp rajan vichare for objectionable remark on tembhi naka dahi handi zws