ठाणे – महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. संसदेमध्ये मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार निवृत्त न्या. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या दरम्यान ‘इंडिया’ आघाडीची किमान १२ मते फुटल्याचे मानले जात आहे.
असे असतानाचा आता शिवसेनेचे खासदार आणि या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावलेले डॉ.श्रीकांत शिंदे यांनी समाज माध्यमांवर एक मजकूर पोस्ट करत सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान केल्याबद्दल इंडिया आघाडीच्या खासदारांचे चक्क आभार मानले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.
दिल्लीतील संसद भवन येथे मंगळवारी देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी निवडणूक लढवली. यावेळी एनडीएकडे बहुमत असताना देखील मतांचे चुकूनही विभाजन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली होती. यासाठी मंत्री किरेन रिजुजी, मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या तीनही खासदारांची उमेदवार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
यामुळे सत्ताधाऱ्यांपैकी एकही मत वाया जाऊ नये यासाठी तीनही खासदारांकडून आखणी करण्यात आली होती. यानंतर संसदेच्या दोन्ही सदनांमधील ७८१ पैकी ७६८ सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७५२ वैध, तर १५ मते अवैध ठरली. भारत राष्ट्र समितीचे ४, बिजू जनता दलाचे ७, शिरोमणी अकाली दल व अपक्ष प्रत्येकी एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नाही. एकूण ९८.२ टक्के मतदान झाल्याचे राज्यसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी पी. सी. मोदी यांनी जाहीर केले.
बहुमतासाठी ३८५ संख्याबळाची गरज होती. भाजपच्या ‘एनडीए’ आघाडीकडे लोकसभेत २९३ तर राज्यसभेत १३३ अशा ४२६ सदस्यांचे पाठबळ होते. तसेच वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील ४ व राज्यसभेतील ७ अशा ११ खासदारांची मतेही मिळण्याची खात्री होती. त्यामुळे ‘एनडीए’चे उमेदवार राधाकृष्णन यांना ४३७ सदस्यांचा पाठिंबा अपेक्षित होता. काही छोट्या पक्षांनीही राधाकृष्णन यांच्या पारड्यात मतदान केल्याचे मानले जाते. त्यामुळे ‘एनडीए’ आघाडीला सुमारे ४४० मते मिळण्याची शक्यता मानली गेली होती.
मात्र, प्रत्यक्षात त्यांना १२ मते अधिक मिळाली. यामुळे विरोधी पक्षातील १२ मते फुटल्याचे बोलले जात आहे. तर ही फुटलेल्या मतांमध्ये महाविकास आघाडीतील खासदारांची देखील मते असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. तर यानंतर उमेदवार प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले खासदार डॉ. शिंदे यांनी इंडिया आघडीतील खासदारांचे आभार मानले आहेत. यामुळे महाविकास आघडीतून मते फुटल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे नेमके काय म्हणाले ?
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा, असं आवाहन काँग्रेसचे यात्रेकरु खासदार राहुल गांधीं यांनी केलं होतं. ‘इंडि’ आघाडीच्या खासदारांनी खरोखरच त्यांचं ऐकलं. अंतरात्म्याच्या आवाजाला जागून त्यांच्यापैकीच अनेकांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत आदरणीय श्री. राधाकृष्णनजींच्याच पारड्यात टाकलं. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारवर विश्वास हाच अंतरात्म्याचा आवाज हे विरोधकांना उशीरा का होईना कळू लागलंय.
देर आये दुरूस्त आये …
भारताच्या उपराष्ट्रपतीपदी १५२ एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले एनडीएचे उमेदवार आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि एनडीएला(NDA) मतदान करणाऱ्या इंडी(INDI) अलायन्सच्या खासदारांचे मनापासून धन्यवाद..