ठाणे बाजारपेठेतील जांभळीनाका भागात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवींद्र परदेशी (४९) यांची फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ध्रुव पटवा (३३) आणि अशरफ अली (२१) या दोघांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जांभळीनाका ही बाजारपेठ ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ ओळखली जाते. या बाजारपेठेत शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवींद्र परदेशी यांचाही व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्यांच्या समोर ध्रुव आणि अशरफ यांनीही व्यवसाय थाटला होता. त्यामुळे ध्रुव आणि अशरफ यांच्याशी रवींद्र यांचे वाद सुरू होते. मंगळवारी रात्री १० वाजता रवींद्र हे परिसरातून जात असताना ध्रुव आणि अशरफ त्या ठिकाणी आले. त्यांनी हातातील चाकूने रवींद्र यांच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती ठाणे नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रवींद्र यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. रवींद्र यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ध्रुव आणि अशरफ या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी जागेच्या वादातून रवींद्र यांची हत्या केल्याची कबुली दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena sub division chief killed in thane amy