आंतरराज्य अॅथलेटिक्समध्ये ठाण्याच्या श्रद्धा घुलेला रौप्य
महाराष्ट्र संघ तृतीय स्थानी
ठाणे : चेन्नई येथे झालेल्या आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणेकर श्रद्धा घुलेने लांब उडी क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. ६.२७ मीटर एवढी लांब उडी मारत तिने हे पदक मिळवले आहे. श्रद्धा घुलेने तिचे प्रशिक्षक नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. सांघिक रिले स्पर्धेत तिने चांगला खेळ करीत महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. रिले संघात चार महाराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश होता. यात प्रत्येक खेळाडूने १०० मीटर धावत उत्कृष्ट खेळ केला. मात्र, ओरिसा व केरळ राज्यांच्या संघांनी ऐन वेळी खेळ उंचावल्याने महाराष्ट्राच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पेटांक्यू कुमार राज्यस्तरीय स्पर्धेत ठाण्याचे संघ
बुलढाण्यात १७ जुलैपासून होणार सुरुवात
ठाणे : पेटांक्यू या आंतरराष्ट्रीय खेळाची कुमार राज्यस्तरीय स्पर्धा १७ जुलै ते १९ जुलै दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव-जामोद या गावी संपन्न होणार आहे. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ाच्या मुलांचे व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. यात प्रशिक्षक सुभाष उंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या संघाचे नेतृत्व विधी पोद्दार करणार असून मुलांच्या संघाचे हितेंद्र महाजन नेतृत्व करणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड होणार आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा पेटांक्यू असोसिएशनचे सुरेश गांधी यांनी दिली.
काय आहे पेटांक्यू खेळ?
पेटांक्यू हा मूळचा फ्रान्स देशाचा खेळ असून तो सध्या १४० देशांत खेळला जातो. या खेळासाठी ३ मीटर बाय १५ मीटरचे मैदान लागते. हा खेळ ६७० ते ७०० ग्रॅम वजनी लोखंडी बॉलने खेळला जातो. एक संघ प्रथम एक टारगेट बॉल मैदानात टाकतो. या टारगेट बॉलजवळ प्रत्येक संघाने बॉल टाकायचा असतो. टारगेट बॉलजवळ बॉल आल्यास त्याचा गुण मिळतो, परंतु या वेळेस विरोधी संघ टारगेट बॉलजवळील दुसऱ्या संघाचा बॉल उडवू शकतो.
अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ठाण्याचे २५ खेळाडू
ठाणे : राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा १९ जुलैला पुण्यात होणार आहे. १४ वर्षांखालील वयोगटासाठी ही स्पर्धा होणार असून यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ांचे संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील बाबूराव सणस मैदान येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुलांचा व मुलींचा सहभाग असून जिल्हा संघटना या स्पर्धेसाठी १३ मुली व १२ मुले असे २५ खेळाडू पाठवणार आहे. या १४ वर्षांखालील वयोगटातील उत्कृष्ट खेळाडूंना गंगानगर राजस्थान येथे २० ते ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.