ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर अनेक सण-उत्सव सुरू केले. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्संस्थेच्या माध्यमातून गेली ४८ वर्ष हा उत्सव साजरा केला जात असून टेंभी नाक्यावरील दुर्गदुर्गेश्वरी देवी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी आकर्षक देखावे उभारून आरास करण्यात येते. हा उत्सव दिघे यांनी का सुरू केला, याविषयी अनेकांना माहीत नसून या मागे असलेली एक रंजक कथा त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितली आहे.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे ठाण्यातील टेंभी नाक्यावर कार्यालय होते. त्यांच्या कार्यालयाला ‘आनंद आश्रम’ म्हणून ओळखले जाते. येथे दररोज रात्री दरबार भरायचा आणि गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम आनंद दिघे करत असत. त्यामुळे त्यांचे कार्यालय म्हणजेच जनतेसाठी आश्वासक दरबार मानला जायचा. याच टेंभी नाक्यावर दिघे यांनी नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती.
उत्सवाचा हाच वारसा
टेंभी नाक्यावर प्रसिद्ध “दुर्गेश्वरी देवी” चा नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. हा उत्सव दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी १९७८ साली सुरू केला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत.
बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा.
यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामीळनाडु येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे. यावर्षीच्या सजावटीची लांबी ११० फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला ४५ फूट आणि पुढच्या बाजूला ५५ फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण ७५ फुटांपर्यंत आहे. या देखाव्यासाठी एकूण १२५ खांब वापरले असून, प्रत्यक्षात २६ खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची २९ फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे.
नवरात्रोत्सव कसा सुरू झाला
आनंद दिघे यांनी नवरात्रोत्सव का सुरू केला, या मागे एक रंजक कथा असल्याचे दिघे यांचे सहकारी आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सांगितले. टेंभी नाक्यावर काही इमारती होत्या. या इमारतींमध्ये गरब्याचे आयोजन केले जायचे. त्याठिकाणी परिसरातील इतरांना प्रवेश दिला जात नव्हता किंवा तिथे जाऊन तो पाहता येत नव्हता. काही लोक इमारतीच्या संरक्षक भिंतीजवळ उभे राहून गरबा बघायचे. ही बाब आनंद दिघे साहेबांच्या निदर्शनास आली होती आणि त्यातूनच त्यांनी टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव साजरा करायचा निर्णय घेऊन हा उत्सव सुरू केला. या उत्सवात रात्री १२ वाजता गरबा सुरू व्हायचा आणि पहाटे बंद व्हायचा, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.