कल्याण – डोंबिवलीतील गरीबापाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौका जवळ पालिकेच्या क्रीडांंगणाच्या आरक्षित भूखंडावर वसंत हेरिटेज या बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीमधील सदनिकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने लावलेल्या मालमत्ता कर प्रकरणाची इत्थंभूत माहिती सादर करा, असे आदेश ठाणे लाचलुपच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बेकायदा इमारतीमधील सदनिकांना कर लावण्याच्या प्रकरणात पालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दहा दिवसापूर्वी सापडले. या प्रकरणाची आता ‘एसीबी’कडून चौकशी सुरू झाली आहे. वसंत हेरिटेज इमारतीची जमीन पालिकेच्या क्रीडांगणाच्या आरक्षणाची आहे. हे माहिती असूनही देवीचापाडा येथील भूमाफियांनी या भूखंडावर दोन वर्षापूर्वी सात माळ्याची बेकायदा इमारत बांधली. यामध्ये १६८ सदनिका आणि सहा व्यापारी गाळे आहेत. या इमारतीमधील सदनिका पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या, दस्त नोंदणी करून घर खरेदीदारांची दिशाभूल करून २८ लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंत विक्री केल्या. बहुतांशी खरेदीदार चाळीतील रहिवासी, रिक्षा चालक आहेत.

हेही वाचा – ठाण्यातील दहा हजारहून अधिक महिलांना मिळणार पालिका योजनेचा लाभ; धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना

या बेकायदा इमारतीला महावितरणने वीज पुरवठा दिला. या इमारतीमधील ११६ सदनिकांना पालिकेचा मालमत्ता कर लावण्यासाठी भूमाफियांनी पालिकेच्या ह प्रभागातील कर विभागातील लिपिक सुनील कर्डक (निवृत्त), योगेश महाले यांच्याशी संगनमत केले. हा बेकायदा व्यवहार करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ५ लाख ५० हजार देण्याची मागणी भूमाफियांच्या मध्यस्थाकडे केली. या व्यवहारातील चार लाख रुपये कर्डक यांनी स्वीकारले. वसंत हेरिटेजमधील ८० सदनिकांना कर्डक यांनी नियमबाह्य कर लावून दिला. उर्वरित ३६ सदनिकांना कर लावण्याची प्रक्रिया सुरू असताना सुनील कर्डक सेवानिवृत्त झाले. मध्यस्थाने कर्डक, महाले यांना कर लावण्याचा तगादा लावला. त्यांनी वाढीव दीड लाख रूपयांची मागणी केली. पैसे घेऊनही कर्डक, महाले काम करत नसल्याने मध्यस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १५ दिवसापूर्वी कर्डक, महाले यांना एसीबीच्या पथकाने ५० हजाराची लाच घेताना अटक केली.

माहिती मागवली

लाचखोर कर्डक, महाले यांच्या सेवा पुस्तिका, त्यांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का. ते कर विभागात किती वर्षापासून आहेत. वसंत हेरिटेज बेकायदा इमारतीला मालमत्ता कर लावण्याची प्रक्रिया कोणत्या नियमाने पार पाडली. वसंत हेरिटेज इमारतीची बांधकामे कोणी केली. सदनिकाधारकांंना घरे विक्री करणाऱ्या विकासक, जमीन मालकांची नावे काय आहेत. किती सदनिकांना अद्याप कर लावणे बाकी आहे, अशी समग्र माहिती एसीबीने पालिकेकडून मागविली आहे. सदनिकाधारकांनी वसंत हेरिटेज इमारत बांधणाऱ्या चार माफियांची नावे पालिका अधिकाऱ्यांना सांगितली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही इमारत जमीनदोस्त करावी, असा अहवाल नगररचना विभागाने आयुक्तांना दिला आहे.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या केबल कार्यालयाची तोडफोड

वसंत हेरिटेजमधील सदनिकांना कर लावल्याची, लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची समग्र माहिती ‘एसीबी’ने मागवल आहे. या माहितीबरोबर ‘एसीबी’ला चौकशीत पूर्ण सहकार्य केले जाणार आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Submit tax documents of vasant heritage illegal building in dombivli anti corruption department order to kalyan mnc ssb
First published on: 20-02-2024 at 16:24 IST