डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्यातील जप्त रक्कम परत करण्यासाठी ठाकुर्ली चोळे गावातील एका विकासकाला पोलिसांनी सहा दिवसापूर्वी बोलविले होते. हा विकासक पोलीस ठाण्यात आल्यावर त्याने पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या दालनात कोणी नाही पाहून, त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून स्वताचे छायाचित्रण करण्यास आपल्या मित्राला सांगितले. ते दबंगगिरीचे छायाचित्रण इन्स्टाग्राम, समाज माध्यमांवर प्रसारित करुन पोलिसांचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर या विकासकाने आपल्या महागड्या वाहनाच्या बाजुला समर्थकांना घेऊन जवळील परवानाधारी शस्त्र हातात घेऊन नाचगाणी सादर केली. समाज माध्यमांवर विकासकाच्या या दबंगगिरीचे छायाचित्रण प्रसारित होताच मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली. विकासकाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>कल्याण, डोंबिवलीकर रस्त्यावरुन चालतायं.. जरा जपून; भरधाव वाहनांच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी

सुरेंद्र पांडुरंग पाटील (५१, रा. अनुसया निवास, खो. क्र. ५, बँक महाराष्ट्रच्या वर, चोळेगाव, ठाकुर्ली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी विकासकाचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद ढाकणे यांच्या तक्रारी वरुन विकासक पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे यांच्या दालनात विकासक सुरेंद्र पाटील यांनी हा गैरप्रकार केला आहे.पोलिसांनी सांगितले, आरोपी सुरेंद्र पाटील यांना साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे करत असलेल्या एका तपास प्रकरणी गुन्ह्यात जप्त केलेली रक्कम परत देण्यासाठी बोलविले होते. विकासक पाटील मानपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना दालना मध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे नसल्याचे दिसले. दालना मध्ये गोरे यांच्या खुर्चीच्या मागे महाराष्ट्र पोलीसांची नाममुद्रा, आरामशीर खुर्ची पाहून विकासक सुरेंद्र पाटील यांना त्या खुर्चीत बसण्याचा मोह आवरला नाही. आपण चित्रपटातील पोलीस अधिकाऱ्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून दबंगगिरी करुन पाहू, असा विचार देखण्या असलेल्या सुरेंद्र यांच्या मनात आला.

त्यांनी गोरे यांच्या मानाच्या खुर्चीत बसून आपल्या सहकाऱ्याला त्याचे चित्रण करण्यास लावले. या चित्रणामध्ये महाराष्ट्र पोलीस नाममुद्रा येईल याची दक्षता घेतली. आपण पोलीस ठाण्यात नियमबाह्य कृती करत आहोत हे आरोपी सुरेंद्रच्या लक्षात आले नाही. हे चित्रण केल्या नंतर सुरेंद्रने स्वताचे परवानाधारी पिस्तुल हातात घेऊन मित्राच्या खांद्यावर बसून नंतर नाचगाणे केले. त्याचेही छायाचित्रण प्रसारित करण्यात आले.

हेही वाचा >>>आमदारांच्या सुरक्षेत वाढ केल्यावरुन भाजपा आमदाराचा शिंदे सरकारला घरचा आहेर

त्यांनी मजेचा एक भाग म्हणून आपण कसे पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून चित्रण केले आणि त्या खुर्चीत बसून आपण कसे हिरो सारखे दिसतो हे मित्रांना कळावे म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यातील चित्रण, हातात पिस्तुल घेऊन केलेल्या नाचाचे चित्रण इन्स्टाग्राम, समाज माध्यमांवर प्रसारित केले.
याविषयी वरिष्ठ पोलीस स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शखेर बागडे यांनी विकासक पाटील यांना अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून आपण शासकीय सेवेत असल्याचे दाखवून, पाठीमागील खुर्चीत महाराष्ट्र पोलीस ही नाममुद्रा आहे हे माहिती असुनही पोलिसांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्याच्या परवान्याचे उल्लंघन केले म्हणून सुरेंद्र पाटील विरुध्द प्रतीमा मलीन करणे, शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.पैशाच्या बळावर आम्ही काही विकत घेऊ शकतो, अशी एक वृत्ती काही विकासकामध्ये फोफावत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मानपाडा पोलीस ठाण्यातील विकासकाचा प्रकार अशा प्रतिक्रिया विविध स्तरातील जाणकारांकडून दिल्या जात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surendra patil a builder in thakurli was arrested amy