ठाणे : स्वच्छता दिवस आणि वन्यजीव सप्ताहनिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरात देखील महापालिकेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत आहे. १ ऑक्टोबर पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून ८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर, १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहनिमित्त देखील शहरात विविध उपक्रमांचे राबविण्यात येत आहेत.‘चला, एकत्र येऊन स्वच्छ आणि सजीव पर्यावरणासाठी पुढाकार घेऊया’ या घोषवाक्याखाली कोरम मॉल आणि लेकशोअर मॉलमध्ये तरूणांनी फ्लॅशमॉब सादर केला. या फ्लॅशामॉबच्या माध्यमातूना नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच शहरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होवून नागरिकांना कचरा इतरत्र टाकू नये असा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
तर, नागरिकांनी पर्यावरणपूरक रांगोळीचा वापर करावा असा संदेश देत फुलांच्या पाकळ्या, लाकडी तुकडे, सेंद्रिय रंग यांचा वापर करुन आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. या उपक्रमातून प्लास्टिक विरहित सण साजरा करण्याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे मास्कॉटद्वारे जनजागृती करुन रिसायकल बीन मास्कॉटद्वारे पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्व यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आले. वाघाच्या रुपातील मास्कॉटने वन्यजीवांचे पर्यावरणातील स्थान आणि जैवविविधतेचे संरक्षण यावर प्रकाश टाकण्यात आला. या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहचविण्यात आला. नागरिकांचा देखील या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या उपक्रमास उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.