ठाणे : ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडापेक्षागृहातील मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. परंतु या मैदानात टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धांच्या आयोजन केल्याने खेळपट्टी आणि मैदानाची जास्त झिज होऊन नुकसान होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे मैदानाची बीसीसीआय आणि एमसीएकडून देण्यात आलेली मान्यता रद्द होण्याची भिती असल्यामुळे प्रशासनाने यापुढे सिझन (लेदर) बाॅल क्रिकेट स्पर्धांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी नव्हती. यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रीकेट सामने होत नसल्याने क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाने नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार करण्यात आल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले. तसेच तब्बल २५ वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने मैदानात पार पडले. या मैदानाची नोंद बीसीसीआय आणि एमसीएकडून घेण्यात आल्याने केळव सिझन बाॅल क्रिकेट स्पर्धा आणि सरावाचे आयोजन करण्याची अट यापुर्वी विभागामार्फत ठेवण्यात आली होती.
परंतु ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २०२२ मध्ये एक ठराव केला होता. त्यानुसार, दिवस-रात्र सत्रात वर्षातून तीन टेनिस बाॅल स्पर्धांकरीता दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह उपलब्ध करून देण्याची सुचना करण्यात आली होती. या सुचनेची अंमलबजावणी करण्यास १८ जानेवारी २०२३ मध्ये आयुक्तांनी मान्यता दिली होती. तसेच याच ठरावात बीसीसीआय आणि एमसीएमार्फत आयोजित विविध रणजी सामन्यांना प्राधान्य देऊन त्यांचे वेळापत्रक वगळता उर्वरित काही दिवसांमध्ये मैदान खासगी संस्थांना टेनिस बाॅल क्रीकेट स्पर्धांकरिता शुल्क आकारून देण्यात येत होते. परंतु या स्पर्धांसाठी वारंवार मागणी केली जात असल्याने रणजी स्पर्धांना प्राधान्य देता येणे शक्य होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या मैदानात टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धांच्या आयोजन केल्याने खेळपट्टी आणि मैदानाची जास्त झिज होऊन नुकसान होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे मैदानाची बीसीसीआय आणि एमसीएकडून देण्यात आलेली मान्यता रद्द होण्याची भिती असल्यामुळे प्रशासनाने यापुढे सिझन (लेदर) बाॅल क्रिकेट स्पर्धांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रीडाप्रेक्षागृहाकडे ओढा
ठाणे महापालिकेमार्फत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता मुंब्रा कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुल आणि घोडबंदर येथील बोरिवडे भागातील महापालिकेचे आरक्षित मैदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाकरीता दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहाकडे नागरिकांचा जास्त ओढा दिसून येत आहे. पर्यायाने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात स्पर्धेस मान्यता मिळणेकरीता संस्थामार्फत दबाव टाकण्यात येतो, असा दावा प्रशासनाने केला आहे.
क्रीडापेक्षागृहातील मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच प्रखर विद्युत दिवेही बसविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत प्रेक्षागॅलरीतील सर्व प्रसाधनगृहाचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. तसेच प्रेक्षागॅलरीता शासन अनुदानात बैठक व्यवस्थेकरीता अत्याधुनीक खुर्चा लावण्यात येत आहेत.