डोंंबिवली – डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका पाथर्ली भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तुळजाभवानी तरूण मित्र मंडळातर्फे दुर्गा उत्सव साजरा केला जातो. गुरूवारी रात्री दुर्गा देवी उत्सवात देवीची आरती सुरू होती. त्यावेळी या भागातील एक गुंड हातात कोयता घेऊन आला आणि कोयत्याने परिसरात दहशत पसरवून परिसरातील रहिवाशांना घाबरून सोडले. रहिवासी सैरावैरा पळून गेले आणि पूर्ववैमनस्यातून एक नागरिकाच्या गळ्यावर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला.

अतुल बाळू अडसूळ असे या गुंडाचे नाव आहे. तो याच भागातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. अतुल विरूध्द इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या नामदेव काशिनाथ कदम (५८) यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

तक्रारदार नामदेव कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे, की अनेक वर्षापासून शेलार नाका डाॅ. आंबेडकर पुतळ्यावर तुळजाभवानी तरूण मंडळातर्फे दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जातो. परिसरातील रहिवासी भक्तीभावाने येथे दर्शनासाठी येतात. याठिकाणी महिला गरबा खेळतात. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता तुळजाभवानी मंडळाची देवी समोर आरती सुरू होती. त्यावेळी आदल्या दिवशीच्या रात्री झालेल्या भांडणाचा राग आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात ठेऊन अतुल अडसुळ हा गुंड तक्रारदार नामदेव कदम यांना शिवीगाळ करत हातात कोयता घेऊन रागाने देवीच्या मंडपात आला. त्याने मोठ्याने आवाज देत अचानक मंडपात उपस्थित असलेले नामदेव कदम यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना मारण्याची कृती केली. त्याचवेळी त्याने आता कोणी नामदेव यांना वाचविण्यासाठी मध्ये पडले तर त्यालाही सोडणार नाही असे बोलत हातामधील कोयता हवेत फिरवून उपस्थित लोकांमध्ये दहशत निर्माण केली.

या सगळ्या प्रकाराने आरतीमध्ये व्यत्य आला. आरतीला उपस्थित असलेले नागरिक, महिला, लहान मुले हा प्रकार पाहून घाबरली. नामदेव कदम यांच्यानंतर आता अतुल अडसुळ आपल्यावर पण कोयत्याने हल्ला करतो की या भीतीने देवीच्या मंडपात उपस्थित असलेले नागरिक, महिला, लहान मुले घरी पळून गेली.

परिसरातील दुकानदारांनी या गुंडाचा आपणास त्रास नको म्हणून दुकाने पटापट बंद करून घेतली. अतुलने पुन्हा नामदेव यांना उद्देशून त्यांच्या दिशेने कोयता फिरवून त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. नामदेव यांनी चलाखीने खाली वाकून बचाव केला म्हणून वाचले. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतले असते.

हा प्रकार पाहून काही नागरिक नामदेव यांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी अतुल याने कोयता हवेत फिरवून कोणी मध्ये पडले तर तुम्हाला पण ठार मारल्या शिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी दमदाटी करून नामदेव यांच्या खिशातील सहाशे रूपये अतुल अडसुळ याने दादागिरी करून काढून घेतले. देवीच्या उत्सवात दहशत पसरवून भाविकांमध्ये घबरट आणि आपल्यासह उपस्थितांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने नामदेव कदम यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे तपास करत आहेत.