ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एनक्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना, झाडावरील पक्ष्यांची घरटी खाली पडून ३६ पिल्लांचा मृत्यु झाला. काही घरट्यातील अंडी पडून ती फुटली. तर, जखमी अवस्थेत असलेल्या २० पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचविण्यात पक्षीमित्रांना यश आले. दरम्यान, संकुलाने नेमलेल्या खासगी ठेकेदारामार्फत झाडांची छाटणी सुरू होती आणि याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठ-मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. एकूणच हा परिसर निसर्गसंपन्न परिसर आहे. याठिकाणी वृक्षांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात. याचमुळे अनेक जण या भागात वास्तव्यास आले आहेत. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून अपघात होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरातील वृक्षांच्या छाटणीची मोहीम पावसाळ्यापुर्वी हाती घेण्यात आली होती. तर, पालिकेच्या सुचनेनुसार गृहसंकुलांच्या आवारातील वृक्ष फांद्यांची छाटणी संकुलामार्फतच करण्यात येते. अशाचप्रकारे घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एनक्लेव्ह या गृहसंकुलाजवळील रस्त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना पक्ष्यांच्या पिल्लांचा मृत्यु झाल्याने पक्षीमित्रांमधून संताप व्यक्त होत आहे.
वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम संकुलाने एका खासगी ठेकेदाराला दिले होते. या ठेकेदारामार्फत वृक्ष छाटणीचे काम गुरुवारी सुरू होते. या वृक्षांवर डोमकावळा आणि बगळा या पक्ष्यांनी घरटी बांधली होती. यापैकी काही पक्ष्यांची पिल्ले घरट्यात होती. तर, काही पक्ष्यांची अंडी घरट्यात होती. वृक्षांच्या फांद्या छाटताना ही त्यासोबत पक्ष्यांची घरटी खाली कोसळली. यात दुखापत होऊन ३६ पिल्लांचा मृत्यु झाला. या परिसरातील रस्ता आणि गटारामध्ये मृत अवस्थेत पिल्ले पडली होती. याबाबत काही नागरिकांनी ही माहिती आम्हाला दिली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती प्राणी पक्षी मित्र तसेच मायपलक्लब फाऊंडेशनच्या संचालक आदिती नायर यांनी दिली. घटनास्थळी २० पक्षी आणि त्यांची पिल्ले जखमी अवस्थेत आढळून आली असून त्यांना दवाखान्यात नेऊन तिथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठिक आहे, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात, ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता, संकुलामार्फत वृक्षांच्या फांद्यांची छाटणी सुरू असताना पक्षांची घरटी पडून त्यात पिल्लांचा मृत्यु झाला आहे. हा प्रकार गंभीर असल्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.