ठाणे- शहरात सराईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा नौपाडा पोलिसांनी पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख ९९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम आणि घरफोडीचे हत्यारे जप्त केले आहेत. गणेश दिलीप गुप्ता उर्फ गणेश प्रकाश आव्हाड ( २०) आणि पुजा दिलीप गुप्ता उर्फ पुजा प्रकाश आव्हाड (४५ )असे आरोपीचे नाव आहे. ते दिवा येथील डंपींग ग्राउंड परिसरात राहतात. गणेश आणि त्याची आई पुजा हे दोघे मिळून ठाणे शहरात संगनमताने घरफोड्या करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ठाणे शहरात नौपाडा भागात राहणारे अतुल शरदचंद्र मराठे यांच्या घरात १३ जुलै रोजी घरफोडी झाली. याघटनेची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील आणि परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात. एक महिला आणि तिच्यासोबत दोन लहान मुले दिसून येत होती. त्यातील एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅग मध्ये घरफोडीकरीता लागणारे सामान काढताना दिसुन आले. त्यानंतर, ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे १०० हुन अधिक सीसीटीव्ही. फुटेज तपासले असता, आरोपी महिला ही सराईत गुन्हेगार असल्याचे निषन्न झाले. आरोपीकडुन १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २.५ किलो ग्रॅम चांदीची भांडी व दागिने आणि ४०,०००/- रोख रक्कम, घराफोडीचे हत्यारे असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध कसा लागला ?

घटनास्थळाजवळील सीसीटिव्ही तपासले असता, घरफोडी केल्यानंतर महिला ही पोलीसांना गुंगारा देण्यासाठी घटनास्थळावरील प्रत्येक रस्ता हा ३००-४०० मीटर पुढे जावुन तिथे १५-२० मिनिट थांबुन पुन्हा रस्ता बदलत असल्याचे दिसले. या महिलेसोबत असलेल्या साथीदारांचा चेहरा एका सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसून आला. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा फोटो काढला. या फोटोंच्या आधारे ठाणे शहरातील सिध्देश्वर तलाव, खोपट, तलावपाळी, चंदनवाडी ठाणे रेल्वे स्थानक परिसर तसेच वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा पोलीस ठाण्याचे हद्दीत तपास केला तसेच काही तांत्रिक तपासावरून आणि गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार ही घरफोडी करणारे आरोपी दिवा डंपीग ग्राउंडमध्ये दाट लोकवस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस त्याठिकाणी गेले असता, आरोपी गणेश याने पोलिसांना पाहून तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन घरफोडीच्या हत्यारासह गणेशला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याला न्यायालयाने २५ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये आरोपीने त्याची आई पुजा आव्हाड हिच्यासोबत मिळून ठाणे शहर परिसरात अनेक घरफोड्या आणि चोऱ्या केल्याचे उघड केले. आरोपी हा त्यास मिळालेल्या घरफोडीतील मोठ्या प्रमाणात सोने व चांदी दागीने आणि शिक्के हे मुंबई व ठाणे परिसरातील सराफास विकून मिळालेले पैसे घेवुन परजिल्ह्यात पसार होण्याचा त्याचा मनसुबा होता.