मनसेच्या तक्रारीनंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू
ठाणे : महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील सदनिकांमध्ये बेकायदा बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचे प्रकरण दिड वर्षांपुर्वी उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या समितीने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. असे असतानाच, याप्रकरणाची आता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली असून याप्रकरणी मनसेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामुळे बीएसयुपी घोटाळ्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांमागे चौकशीचा फेरा लागल्याचे चित्र आहे.
ठाणे येथील धर्मवीरनगर येथे २०१३ साली महापालिकेने बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून आनंदकृपा या इमारतीचे बांधकाम केले. इमारत क्रमांक २३ मध्ये रहिवाशांना सदनिकांचे वाटप करण्यात आले होते. सदनिकांचे वाटप केल्यानंतर ६०३, ८०२,८०४, ८०५ व ८०७ या क्रमांकाच्या सदनिका शिल्लक राहिल्या होत्या. या सदनिकांचा काही नागरिकांनी बेकायदा ताबा घेतला होता. याबाबत इमारतीमधील रहिवाशांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु महापालिकेने काहीच कारवाई केली नव्हती. याप्रकरणी रहिवाशांनी मनसेचे संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीएसयूपीतील अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेने तत्कालीन आयुक्त विपीन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. परंतु चौकशी समिती नेमूनही गेल्या दीड वर्षात या घोटाळ्याप्रकरणी कोणावरही कारवाई झालीच नाही. त्यामुळे पाचंगे यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन या विभागाने याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या विभागाने बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या तक्रारीवरून जबाब नोंदवून घेतला असून कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळा सुरूच, जि. प. शिक्षण विभागाकडून कारवाईच्या फक्त नोटिसा
“भाडेखाऊ” गजाआड कधी होणार?
२०१३ पासून या योजनेतील उरलेल्या घरांमध्ये अनधिकृतरित्या लोक राहत आहेत. या लोकांकडून स्थानिक गुंड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या साथीने भाडे उकळत होते. बऱ्याच ठाणेकरांना घरे मिळवून देतो म्हणून फसविण्यात आले आहे. बीएसयुपी प्रकल्पाच्या घरे बांधणी पासून ते सदनिका वाटप या सर्वच बाबतीत भ्रष्टाचार झाला आहे. सध्या राहणारे नागरिक देखील त्रस्त आहेत. अद्याप सोसायटी हस्तांतरीत झालेल्या नाहीत. चौकशी समिती अहवाल अद्याप बाहेर न आल्यामुळे काही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचे सिद्ध होते आहे.- संदीप पाचंगे- सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.