ठाणे – ठाणे महापालिका हद्दीत उभ्या राहत असलेल्या बेसुमार बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी सुरू असताना अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखालाच बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अटक करण्यात आल्याने या चौकशी प्रक्रियेला आगामी काळात अधिक बळ मिळण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.
न्यायालयाने नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारलेल्या १९ प्रश्नांचा अहवाल प्रशासनाने बुधवारी सकाळीच सादर केल्याचे वृत्त आहे. या अहवालातील तपशील अजुन बाहेर आला नसला तरी, उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या अटकेमुळे येथील प्रशासकीय व्यवस्थेला मोठी चपराक बसली असून चौकशी प्रक्रियेतून सहीसलामत सुटण्यासाठी येथील यंत्रणांची सुरू असलेली धडपड ही उघड झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना बुधवारी रात्री उशिरा मुलुंडस्थित एका बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून रंगेहात लाच घेताना अटक करण्यात आली. बुधवारी ठाणे महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन होता. हा सोहळा मोठ्या सोकात पार पडला. महापालिका कशी सक्षम आहे याचे कोड कौतुकही या सोहळ्यात गायले गेले.
शंकर पाटोळे हे देखिल या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. पाटोळे कार्यालयात परतले आणि काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात सापडले. एका बिल्डरकडून काही लाख रूपये स्विकारताना पाटोळे यांना रात्री उशिरा अधिकृत अटक करण्यात आली. २०२१ मध्ये याच पाटोळे यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. ते सहाय्यक आयुक्त असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप होता.
पाटोळे आणि त्यांचे दुसरे सहकारी सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे या दोघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. या काळात बिपीन शर्मा यांच्याकडे महापालिकेचे आयुक्त पद होते. ही चौकशी सुरू असतानाच पाटोळे ठाण्यातील काही सत्ताधीशांच्या वर्तुळात वावरू लागले. बघता बघता त्यांना उपायुक्त पदी बढती देखिल मिळाली. विभागीय चौकशी सुरु असणाऱ्या एका अधिकाऱ्याला बढती मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु राजकीय वरदहस्तामुळे पाटोळे म्हणतील ती पुर्व दिशा असा कारभार ठाणे महापालिकेत ऐव्हाना सुरू झाला होता.
तीन वर्षात शेकडोंनी बांधकामेपाटोळे यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा कार्यभार नव्हता, त्या काळातही महापालिका क्षेत्रात शेकडोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या राहत होत्या. कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर, बाळकुम या भागात उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांना राजकीय आशीर्वाद होता असे बोलले गेले.
राज्यात सत्ता बदल होत असताना ठाण्यात माजी नगरसेवक आणि प्रभावी पदाधिकाऱ्यांची पळवापळवी ही सुरू झाली. ही पळवापळवी करत असताना जी काही आमिष पुढे दाखवली गेली, त्यामध्ये बेकायदा बांधकामांना दिला जाणारा आशिर्वाद एक प्रमुख कारण ठरलं. दिव्यातील प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू झाली तेव्हा मात्र महापालिकेचे प्रशासकीय व्यवस्थेचे डोळे उघडतील अस बोलल जात असतानाच पाटोळे यांना अशाच एका प्रकारणात अटक झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
न्यायालयीन चौकशीतही पाटोळे केंद्रस्थानी ?
न्यायालयाने नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीने मध्यंतरी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना १९ प्रश्न पाठवून अहवाल मागविला होता. या १९ प्रश्नांपैकी काही प्रश्न शंकर पाटोळे यांच्याशी संबंधित होते. पाटोळे यांना मिळालेली बढती, विभागीय चौकशी सुरू असताना त्यांना दिला गेलेला महत्वाचा पदभार याविषयी काही थेट प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत.
या प्रश्नांचे महापालिका आयुक्ताने नेमक काय उत्तर दिल हे जरी गुलदस्त्यात असले तरी न्यायालयीन चौकशी सुरू असताना अतिक्रमण विभागाच्या कार्यालयावर पडलेल्या छाप्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्थेला पुन्हा एकदा नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याच प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. आयुक्त सौरभ राव यांनी याविषयी मत व्यक्त केलेली नाही.