Thane News : ठाणे : येथील किसन नगर क्र. २ मधील मस्जिद गल्लीमध्ये असलेल्या तिवारी सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळला. या घटनेनंतर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली असून यातील १७ रहिवाशांना ठाणे महानगरपालिका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
किसन नगर क्र. २ मधील मस्जिद गल्लीमध्ये तिवारी सदन हि इमारत तळ अधिक ३ मजली असून सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेली आहे. ही इमारत सी २ बी (C2B म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे.) प्रवर्गातील असल्याने आधीपासूनच धोकादायक स्थितीत असून, सद्यस्थितीत तिच्या संरचनात्मक दुरुस्तीचे काम सुरू होते. मंगळवारी झालेल्या घटनेत दुसऱ्या मजल्यावरील रीता प्रकाश उपाध्याय यांच्या मालकीच्या रूम क्रमांक ६ या खोलीचा स्लॅब कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सार्वजनिक बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. इमारतीत राहणाऱ्या १७ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात धोकापट्टी पट्टे लावून बॅरिगेटिंग केली असून, घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम व अतिक्रमण विभागामार्फत पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.