लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे – ठाणे महापालिका मुख्यालय इमारती, पालिकेच्या इतर वास्तु, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलांवर दिवाळी सणानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळले आहे. ही रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विद्यूत रोषणाईमुळे सायंकाळच्या वेळेत शहराला एक वेगळेच रुप प्राप्त होत आहे.

दिवाळी सण हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीनिमित्त शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्यूत रोषणाई करण्याचा उपक्रम ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरु केला. या उपक्रमात त्यांनी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि शहरातील व्यापारी वर्गाच्या मदतीने शहरात विद्युत रोषणाई केली. तेव्हापासून ही परंपरा शहरात कायम आहे. करोना काळात या परंपरेत काहीसा खंड पडला होता. परंतु गेल्यावर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून यंदाही ही परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-दिवा तलावाला प्रदुषणाचा विळखा

यंदाही दिवाळीच्या दहा ते पंधरा दिवस आधीपासून शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच उड्डाणपूलांवर विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील राममारुती रोड, स्थानक परिसर, नौपाडा, गोखले रोड, जांभळी नाका बाजारपेठ, शहरातील मुख्य उड्डाणपूल, पालिका वास्तु विद्यूत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. या विद्यूत रोषणाईमुळे सायंकाळच्या वेळेत शहराला एक वेगळेच रुप प्राप्त झाले आहे. ठाणे महापालिकेने मुख्यालय इमारतीसह इतर वास्तुंवर तर, व्यापारी वर्गाने राममारुती रोड, स्थानक परिसर, नौपाडा, गोखले रोड, जांभळी नाका बाजारपेठ परिसरात विद्यूत रोषणाई केल्याचे दिसून येत आहे. तसेच कोपरी, तीनहात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन असे महत्त्वाच्या उड्डाणपूलांवर एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकाच्या संघटनेने रोषणाई केली आहे. या विद्यूत रोषणाईमुळे खरेदी साठी येणाऱ्या नागरिकांनाही प्रसन्न वाटत आहे.

राममारुती रोडवरील वृक्षांना विद्यूत माळेचा विळखा

शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून राम मारुती रोड हा ओळखला जातो. या मार्गावर बड्या व्यापाऱ्यांसह लहान व्यापाऱ्यांची सोनं, कपडे, इलेक्ट्रॅानिक वस्तूंची दुकाने सर्वाधिक आहेत. दिवाळीत या मार्गावरही सर्वाधिक ग्राहक खरेदी साठी येतात. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी विद्यूत रोषणाई केली जाते. यंदाही रस्त्याच्या मध्यभागी आणि पदपथांवर रोषणाई करण्यात आली आहे. परंतू, यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर असलेल्या वृक्षांनाही विद्यूत माळा गुंडाळण्यात आल्याचे दिसून येत आहे.