ठाणे : प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि पारदर्शकता यावी, या उद्देशातून ठाणे महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार ई- ऑफिस प्रणाली अडीच महिन्यांपुर्वी लागू केली आहे. मात्र, या प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडे संगणक उपलब्ध नसून त्यांना कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटाॅपचा वापर करावा लागत आहे. निधी अभावी संगणक खरेदी रखडल्याने त्यांना संगणकाचे वाटप करण्यात आली नसल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यलयात यावे लागू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
ठाणे महापालिकेच्या कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ई-प्रणाली लागू करण्यात येईल, अशा घोषणा राव यांनी केली होती. तसेच राज्य शासनानेही ई-प्रणाली लागू करण्याची सुचना पालिकेला केली होती. त्यानुसार, आयुक्त राव यांनी एप्रिल महिन्यापासून ई-प्रणाली लागू केली. यामुळे पालिकेची कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे चित्र होते. या प्रणालीसाठी ठाणे महापालिकेने विभागवार सर्वेक्षण केले होते आणि कोणत्या विभागाला संगणकाची गरज आहे, त्याची माहिती घेतली होती. त्यात सुमारे १२५ संगणकांची आवश्यकता असल्याची बाब पुढे आली होती. यानुसार पालिकेने १२५ संगणक खरेदी बरोबरच इतर साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता.
१ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता. यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने ७५ संगणकांचा पुरवठा करून त्याचे ४८ लाखांचे देयक जमा केले. मात्र, ते देयक अद्याप मिळालेले नसल्यामुळे ठेकेदाराने पुढील संगणकाचा पुरवठा केलेला नाही. त्याचा फटका अनेक अधिकाऱ्यांना बसला असून त्यांना ई प्रणालीद्वारे कामकाज करण्यासाठी कार्यालयातील इतरांच्या संगणकाचा किंवा स्वमालकीच्या लॅपटाॅपचा वापर करावा लागत असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संगणकाची कमतरता नसल्याचा दावा केला. एखाद्या विभागात जरी संगणक कमी असले तरी तेथील इतर संगणकांवर कामकाज सुरू असून संगणक अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
ई प्रणाली कामकाज
शासनाच्या एनआयसी या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई-प्रणालीची अंमलबजावणी करीत आहे. ही प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देत आहेत. हे कामकाज कसे करायचे याचे प्रशिक्षण महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापुर्वीच देण्यात आले असून या प्रशिक्षणानंतर म्हणजेच १ एप्रिलपासून हे कामकाज सुरूही झाले आहे. या प्रणालीमुळे प्रस्तावाची नस्ती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवणे शक्य होत आहे.
अनेकदा विविध प्रस्तावांच्या नस्ती पालिकेतून गायब झाल्याचे समोर आले होते. मात्र, या प्रणालीमुळे नस्ती गायब होण्याचे प्रकार टळणार आहेत. या प्रणालीद्वारे मंजुर झालेले प्रस्ताव तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रणालीसाठी महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक शासकीय ई मेल आयडी करण्यात आला आहे.