ठाणे – “हर घर तिरंगा” मोहिमेच्या निमित्ताने ठाणे जिल्हा प्रशासनाने एक वेगळाच उपक्रम राबवित शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक आणि आणीबाणीविरोधी सत्याग्रहींचा थेट घरी जाऊन सन्मान केला. तर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वतः शहीद हवालदार सुधीर धोंडू आंब्रे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुप्रिया आंब्रे यांची घरी भेट घेऊन त्यांना आभारपत्र देत सन्मानित केले.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे १७ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हवालदार आंब्रे यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहीद कुटुंबीयांचा तसेच माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक यांचा सन्मान करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार व महसूल अधिकाऱ्यांनी शहीद सैनिकांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नींच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांना आभारपत्र देत त्यांच्या त्यागाची आठवण ताजी करण्यात आली.

तर माजी सैनिकांनाही विशेष आदर देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या स्वाक्षरीचे आभार व प्रशंसा प्रमाणपत्र १०,००० हून अधिक माजी सैनिकांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आले. तसेच, १९७५ च्या आणीबाणीविरोधी लढ्यात सहभागी झालेल्या १२९ सत्याग्रहींना तहसिलदारांमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

ठाणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेला हा विशेष उपक्रम “हर घर तिरंगा” मोहिमेला एक भावनिक स्वरूप देणारा ठरला.