ठाणे : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा कनिष्ठ लिपीक किशोर मानकामे (६४ – सध्या सेवानिवृत्त) याला ठाणे न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कनिष्ठ लिपिक किशोर मानकामे हे सध्या सेवा निवृत्त आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. त्यांनी २०१७ मध्ये तक्रारदार यांच्याकडून तक्रारी प्रकरणाच्या फाइल दाखल करुन घेण्यासाठी २०० रुपये प्रमाणे पाच फाइलीचे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना एक हजार रूपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हातोहात पकडले. त्यांच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
विभागाने गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ठाणे न्यायालयातील विशेष सत्र न्यायालयात मानकामे याच्याविरोधात दोषारोप पत्र सादर केले होते. गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायधीशांच्या समक्ष झाली असताना मानकामे याच्याविरोधात सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्याने मंगळवारी न्यायालयाने मानकामे याला एक वर्ष सश्रम कारावासाची आणि एक हजार रुपये दंडाची तसेच दंड भरला नाही तर एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.