मुख्य बाजारपेठेत बुधवारी दुपारी एका सराफाच्या दुकानात नकली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पाच हजारांची रक्कम लुटणाऱ्या आशीष कोळी (२२) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. प्रेमविवाह करण्यासाठी पैशांची चणचण भासल्यामुळे त्याने चोरीचा मार्ग अवलंबला, तसेच या चोरीकरिता त्याने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नकली रिव्हाल्व्हरचा वापर करून सराफाला धाक दाखवला.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाजारपेठेत पूनामिया नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. बुधवारी हे दुकान बंद होते. मात्र, मालक विपुल पूनामिया आणि त्यांचा एक नोकर दुकानात साफसफाईचे काम करीत होते. दरम्यान, दुपारी साडेचारच्या सुमारास आशीष त्यांच्या दुकानात शिरला आणि त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दागिन्यांची मागणी केली. परंतु विपुल यांनी सोन्याऐवजी पाच हजारांची दिली. यानंतर त्याच्या सांगण्यावरून दुकानाचे शटर बंद करीत असताना विपुल यांनी त्याच्या अंगावर झडप टाकली आणि त्याचे रिव्हॉल्व्हर खेचून घेतले. यामुळे त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तिथेच धडपडून पडला. त्या वेळी नागरिकांच्या मदतीने विपुल आणि त्यांच्या नोकराने त्याला पकडले आणि ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
बदलापूर : बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान एका खांबाजवळ रूळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून सागर देठे या तरुणाचा बुधवारी दुपारी १२च्या सुमारास मृत्यू झाला. बदलापूर येथील मेघ आपार्टमेंट, बॅरेज रोड येथे सागर राहत होता. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती व त्यात आई, बहीण आणि एक गतिमंद भाऊ यांची जबाबदारी सागरवर होती. या सर्व परिस्थितीला तोंड देत त्याने दहावीत ९४ टक्के गुण मिळवले. संपूर्ण कुटुंबाचा भार सागर मेहनतीने सांभाळत होता. शिक्षणात नेहमी अव्वल राहणाऱ्या सागरने स्वतच्या हिमतीवर इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला होता. तो नेरुळच्या रामराव आदिक इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षांला शिकत होता.
त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या महाविद्यालयावर शोककळा पसरली. त्याच्या मित्रांनी लगेच त्याच्या घरी धाव घेतली. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस हवालदार जाधव यांनी त्याच्या मृत्यूची नोंद केल्याचे या वेळी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या पाच घटना
ठाणे : मुलुंडमधील भावेश दत्ताराम ठोंबरे (१९) यांची डोंबिवली येथील जिजाईनगर भागातील अनुपमा इमारतीच्या तळमजल्यावर उभी केलेली ८० हजारांची मोटारसायकल चोरीस गेली. कल्याणमधील गोरखनाथ मारुती राजगुरू (४८) यांची आंबिवली पूर्व येथून चोरटय़ाने १२ हजारांची मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. डोंबिवली येथे राहणाऱ्या संजय नरसिंहराव परांडे (५०) यांची ३५ हजारांची मोटारसायकल त्यांच्या इमारतीच्या आवारातून चोरटय़ांनी चोरून नेली.
अंबरनाथमधील हिरासिंग लहानुजी भस्मे यांची ३० हजारांची मोटारसायकल चोरटय़ांनी त्यांच्या घराजवळून चोरली. बदलापूरमधील दीपक अशोक सोनावणे (३३) यांची २० हजारांची मोटारसायकल संजीवनी हॉल परिसरातून चोरटय़ाने चोरून नेली. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
तरुणाची आत्महत्या
अंबरनाथ : वसारगाव येथे राहणाऱ्या राहुल राजाराम जाधव (२५) याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी हिललाइन पोलीसात नोंद झाली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
गुन्हेवृत्त : प्रेमविवाह करण्यासाठी नकली रिव्हॉल्व्हरने सराफाला लुटले
मुख्य बाजारपेठेत बुधवारी दुपारी एका सराफाच्या दुकानात नकली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पाच हजारांची रक्कम लुटणाऱ्या आशीष कोळी (२२) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली.
First published on: 20-02-2015 at 12:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane crime news in short