Animal Abuse Case News : घोडबंदर येथील वेटिक या पशू चिकित्सालयातील कर्मचाऱ्यांनी एका श्वानाला अमानुष मारहाण करून त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. संपूर्ण देशभरात हे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर याप्रकरणी श्वानाला मारहाण करणारे कर्मचारी आणि वेटिक चिकित्सालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात रात्री उशीरा चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेटा या प्राणीमित्र संघटनेच्या स्वयंसेवकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोडबंदर येथील मानपाडा भागात वेटिक हे पशु चिकित्सालय आहे. या चिकित्सालयात अनेकजण त्यांच्या पाळीव प्राण्यांना उपचारासाठी घेऊन येत असतात. मंगळवारी या चिकित्सालयातील एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. यामध्ये चिकित्सालातील कर्मचारी मयूर आढाव हा श्वानाला तोंडावर, पाठीत जोरदार बुक्या, लाथ मारताना दिसून येत होता. याचे चित्रीकरण प्रशांत गायकवाड या कर्मचाऱ्याने केले होते. तसेच ते समाजमाध्यमावर प्रसारित केले. हे चित्रीकरण विविध समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात प्रसारित झाले. तसेच या घटनेविषयी सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा.. ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईमुळे महापालिका आणि पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस

चिकित्सालयातील कर्मचाऱ्यांनी श्वानाला केलेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती ठाण्यातील ‘पाॅज’ या प्राणी प्रेमी संस्थेने महापालिका, पोलीस आणि इतर विभागांना दिली. तसेच याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी ठाणे महापालिका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी वेटिकचे कर्मचारी मयूर आणि प्रशांत या दोघांना ताब्यात घेतले. वेटिक कंपनीने प्राथमिक कारवाई म्हणून त्या दोघांना कामावरून काढून टाकले आहे. परंतु याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने प्राणी प्रेमी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. श्वानाचे मालक विवाह सोहळ्यानिमित्ताने बाहेर गेले होते. त्यांना समाजमाध्यमावरील चित्रीकरण मिळाल्यानंतर त्यांच्याकडूनही कारवाईची मागणी केली जात होती.

हेही वाचा… ठाणे : एक वर्षात बाललैंगिक अत्याचारांची ३५५ प्रकरणे, १३९७ अपहरण; अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक

गुरुवारी दुपारी आमदार प्रताप सरनाईक यांनी वेटिक चिकित्सालयाला भेट दिली. त्यावेळी चिकित्सालय बंद होते. महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी, चितळसर पोलीस आणि वेटिक चिकित्सालयातील प्रतिनिधींना घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी बोलविले होते. परंतु वेटिक चिकित्सालयाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. याबाबत सरनाईक यांना नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला जावा अशी सूचना पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना संपर्क साधून केली. त्यानंतर याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात श्वानाला मारहाण करणारे कर्मचारी आणि वेटिक चिकित्सालयातील अधिकाऱ्यांविरोधात कलम ४२९ आणि ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने देखील वेटिक चिकित्सालयाविरोधात कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane dog abuse case fir filed against person who recorded video owner and manager of vetic veterinary clinic asj