ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पथके तयार करून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली असली तरी भूमाफियांकडून बांधकामे उभारण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेचे राखीव मोकळे भूखंड अनधिकृत गाळे आणि चाळी बांधून भूमाफिया गिळंकृत करत आहेत. नागरीकांच्या तक्रारीनंतर या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून भूखंड मोकळे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून या बांधकामाला संरक्षण देण्याचे काम पालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागातील अधिकाऱ्यांनी करीत असल्याचा आरोप शिंदे गटाचे जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेचे शास्त्रीनगर विभागात मोक्याच्या जागी मोकळे भूखंड आहेत. या भूखंडांवर भूमाफियांची गेल्या अनेक वर्षांपासून नजर आहे. या जागांवर अतिक्रमण होऊ नये याची काळजी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घेत आहेत. जेष्ठ नागरिक कट्टा, आरोग्य केंद्र, डीपी रोडचे या भूखंडांवर नियोजन आहे. तसा कार्यादेशही काढण्यात आला आहे. तरीही येथे अनधिकृत बांधकाम होत असल्याचे सांगत जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

आदेशाची पायमल्ली

या अनधिकृत बांधकामाप्रकरणी गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२४ मध्ये स्थानिकांनी हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य नगर – सावरकर नगर प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. अतिक्रमणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पालिका प्रशासनाला निष्कासनाच्या कारवाईचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची ठाणे महापालिका अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पायमल्ली करत भूमाफियांना मोकळे रान दिले आहे, असा आरोप जगदाळे यांनी केला आहे.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेचे राखीव मोकळे भूखंड अनधिकृत गाळे आणि चाळी बांधून भूमाफिया गिळंकृत करत आहेत. येथील या सर्व मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत गाळे आणि चाळी बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच मोठ्या नाल्याच्या बाजूला चाळी बांधून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची परिस्थितीची भीती आहे. या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करा आणि भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, अन्यथा प्रभाग समिती आणि पालिका मुख्यालयावर स्थानिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा हणमंत जगदाळे यांनी दिला आहे.