ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्या वनमंत्री असलेले भाजपचे गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या निणर्याला नाईक यांनी कडाडून विरोध केला होता. तसेच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात जनता दरबारचा उपक्रम घेऊन गणेश नाईक यांनी शिंदे यांना थेट आव्हान केल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या. असे असतानाच आता नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक मंत्री असलेल्या वनखात्यावर चांगले संतापलेले दिसून आले. यावेळी त्यांनी आडमुठेपणा करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचाच इशारा दिला. यामुळे शिंदे आणि नाईक वाद पुन्हा उफाळून येतो कि काय ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाळयाच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध खबरदारीच्या उपायोजना राबविण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनचा आढावा घेतला. यावेळी पावसाळ्यात सर्व विभागांना योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. मात्र यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

नेमके झाले काय ?

ठाण्यात अत्यंत महत्वाचा असा गायमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र या रस्त्यावर खड्डे पडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल मात्र गायमुख रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अद्याप झाले नाही. प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावे आणि रस्त्यावर सध्या मास्टिकचे काम करून खड्डेमुक्त करावा अशा स्पष्ट सुचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा प्रशासनाला दिल्या. तर वनविभागाने परवानगी दिली नसल्याने काँक्रीटीकरण झाले नसल्याची बाब समोर आल्यास संतप्त होऊन एकनाथ शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला. ” जुन्या रस्त्याच्या कामाला कशासाठी हव्यात परवानग्या, तुमच्या परवानग्यांपेक्षा माणसाचा जीव मोठा आहे. सार्वजनिक हिताच्या आड आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू ” अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वनविभागाला खडसावले.