ठाणे – चित्रपटसृष्टीतील विविध मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मुंबई महत्वाची मानली जात असली तरी काही वर्षांपासून ठाण्यातही मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण केले जात आहे. ठाण्यातील तलाव, रस्ते, नैसर्गिक संपदा असलेली ठिकाणे, मॉल चित्रपटसृष्टीला खुणावत असतात. अशातच शहरातील मध्यवर्ती आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोखले रोड परिसरातही अनेक चित्रीकरण केले जातात. मात्र यामुळे या परिसरात पदपथ अडवले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र असते.

चित्रपटसृष्टीची मायानगरी म्हणुन मुंबईला ओळखले जाते. अनेक हिंदी, मराठी मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईच्या विविध भागांमध्ये होत असते. मात्र मागील काही वर्षांपासून ठाण्यातील विविध ठिकाणे चित्रकरणासाठी खुणावत असल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील तलाव, रस्ते, निसर्गरम्य ठिकाणे, त्याचप्रमाणे नव्या महानगरीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आहेत. या सर्वामुळे चित्रीकरणाला वेगळी शोभा येते. मालिकांमधील बहुतेक कलावंत मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली परिसरात राहतात. ठाणे त्यांच्यासाठी मध्यवर्ती पडते. यामुळे मोठ्या प्रमाणावर ठाण्यात चित्रीकरण होत असते.

अशातच शहरातील राम मारूती रोड, गोखले रोड हा महत्वाचा परिसर देखील चित्रीकरणासाठी वापरला जात आहे. या भागात अनेक गृहसंकुले, कार्यालये तसेच विविध वस्तूंची दुकाने आणि शाळा देखील आहेत. त्यामुळे या परिसरात कायमच नागरिकांची वर्दळ असते. अशातच या चित्रीकरणासाठी पदपथ आणि रस्त्याचा भाग वापरला जात असल्याने पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होते आहे.

या परिसरात अनेक मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. यामुळे तांत्रिक साहित्य, कॅमेरे, लाईट्स पदपथावर उभी केली जातात. त्यामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे बंद केला जातो. परिणामी, नागरिकांना पदपथांवरून चालणे शक्य होत नाही.

ठाणे आणि चित्रीकरणाचा संबंध काय ?

ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणुन ओळखले जाते. या शहरात अनेक अभिनेते, अभिनेत्री वास्तव्यास आहेत. शहरातील गडकरी रंगायतन परिसर, मासुंदा तलाव, उपवन तलाव, विविध मॉल, वसंत विहार परिसर, कासारवडवली, गायमुख, कोलशेत, कापुरबावडी अशा विविध परिसरात चित्रीकरण सुरू असते. मागील काही वर्षात अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण या भागांमध्ये करण्यात आले होते. तसेच, चित्रीकरणासाठी पदपथांचा देखील वापर केला जात असतो. मात्र वर्दळीच्या पदपथांवर चित्रीकरण केले जात असल्याने नागरिकांमधून याबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.