ठाणे : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे अमीष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील एका सराफाला ठाणे न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संतोष शेलार असे आरोपीचे नाव असून इतर दोघांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नौपाडा येथील विष्णुनगर भागात त्रिमुर्ती रत्न ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान होते. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत संतोष शेलार याने तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला सोन्याच्या योजनेत १५ महिने गुंतवणूक केल्यास चांगला परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे अमीष दाखविले होते. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांच्या मुलाने प्रत्येक एक हजार असे १५ महिने ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. यानंतर तक्रारदार यांनी योजनेनुसार, पैशांची तसेच सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली असता, संतोष याने त्यांना कोणताही परतावा केला नाही.
२०१९ मध्ये याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात संतोष शेलार याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा समांतर तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सुरु होते. याप्रकरणात पोलिसांनी संतोष शेलार याच्यासह तिघांना अटक केली होती.
आणि कारावास…
तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एम.एम. विसपुते यांनी भक्कम पुरावे गोळाकरून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. याप्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात सुरु होती. न्यायधीश जी.टी. पवार यांनी संतोष शेलार याला दोषी ठरवून त्यास सात वर्ष सश्रम कारावास आणि पाच लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
दंड भरला नाही तर, दोन वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याप्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता विवेक कडू, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एम.एम. विसपुते, सध्याचे तपासी अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या पाटील, पोलीस हवालदार आडिवरेकर, न्यायालय पैरवी साजिद शहा, नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार म्हामुनकर, वीर यांनी परिश्रम घेऊन न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आले.