ठाणे : दिव्यातील बेसुमार बांधकामांमुळे उच्च न्यायालयाकडून चपराक सहन कराव्या लागलेल्या ठाणे महापालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे जिल्ह्यातील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा पडण्याची भिती लक्षात घेऊन महापालिकेच्या संबंधित यंत्रणांना आतापासूनच सर्तक राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत.
बुलेट ट्रेनचे हे स्थानक दिवा भागातील म्हातार्डी येथे उभारले जणार आहे. दिव्याला यापुर्वीच पडलेल्या बेसुमार बांधकामांचा विळखा लक्षात घेता बुलेट ट्रेन प्रकल्प परिसर भुमाफियांकडून लक्ष्य होण्याची भिती यापुर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. म्हातार्डी भागात उभारण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या सभोवतालचा परिसरही विशिष्ट पद्धतीने विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे अधिकारी, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी, ठाणे महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. यामध्ये म्हातार्डी येथील स्थानकाला बेकायदा बांधकामांचा विळखा बसू शकतो, अशी भिती सातत्याने व्यक्त केली जात आहे. दिवा परिसरात बेकायदा बांधकामे उभारणारी एक मोठी टोळी वर्षोनुवर्षे कार्यरत आहे. बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांच्या सभोवतालची मोकळ्या जागा या टोळीकडून लक्ष्य केले जाण्याची भितीही संयुक्त बैठकांमध्ये उपस्थित केली जात होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या प्रशासनाला सर्तक करत या भागात एकही अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका, असे आदेश दिले आहेत.
प्रकल्पाचा विकास आराखडा देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या भागीदारीतून केंद्र सरकार हा प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत बुलेट ट्रेन मार्गिका आणि त्या मार्गावरील स्थानकांचे बांधकाम नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत केले जात आहे. या मार्गिकेमध्ये ठाणे महापालिका हद्दीतील सेक्टर क्र. १० मधील मौजे म्हातार्डी येथे (ठाणे) बुलेट ट्रेन स्थानक उभारण्यात येणार आहे. याठिकाणी बुलेट ट्रेन मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था यांच्यामध्ये ४ मॉडेल स्थानक परिसराच्या विकसनाच्या नियोजनाबाबत तांत्रिक सहकार्याकरीता सामंजस्य करार झालेला आहे. त्या अंतर्गत जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या सल्लामसलतीने आणि दिशानिर्देशानुसार ठाणे बुलेट ट्रेन परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार या भागाचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुनियोजीत रस्त्यांचे जाळे, मेट्रो मार्ग, विविध आरक्षणे प्रस्तावित करण्याचे तसेच विशेष वापर विभाग नियमावली लागू करण्याचे नियोजन आहे. परंतु शहरातील मोकळ्या जागांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढीस लागले असून यातूनच म्हातार्डी येथे बुलेट ट्रेन स्थानक परिसरासाठी प्रस्ताविक मोकळ्या जागांवर अतिक्रमण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
आदेश काय आहेत?
म्हातार्डी येथीलबुलेट ट्रेन स्थानक आणि त्याच्या सभोवतलाच्या परिसरातील विकासामध्ये बेकायदा बांधकामांमुळे अडथळा येण्याची धास्ती असल्याने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक परिपत्रकच काढले आहे. त्यात या क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, उपायुक्त, अतिक्रमण, उपायुक्त परिमंडळ आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. प्रस्तावित क्षेत्रातील अस्तित्वातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर प्राधान्याने निष्कासनाची कारवाई करण्यात यावी. या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.