ठाणे : कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे स्थान प्राणीपालकांकडून देण्यात येते. परंतु अशा पाळीव प्राण्यांसाठी शहरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे पाळीव प्राण्याचा काही कारणास्तव मृत्यु झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे प्राणीपालकांना शक्य होत नव्हते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने माजिवडा भागात पाळीव प्राण्यांची पहिली स्मशानभूमी उभारली असून तिचे लोकार्पण आज, शनिवारी होणार आहे. यामुळे पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होणार असल्याने प्राणी पालकांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात कुत्रे, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक घरांमध्ये या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे आहे. परंतु, आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाण्यात प्राण्यांची स्मशानभूमी नसल्याने अनेकांची अडचण होत होती. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी असावी अशी मागणी प्राणीपालकांकडून व्यक्त होत होती. याचदरम्यान, मुक्या प्राण्यांसाठी एक स्वातंत्र स्मशानभूमी असावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आणि तशी सुचना त्यांनी ठाणे महापालिकेला केली होती. यानंतर ठाण्यातील कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे पाळीव आणि लहान प्राण्यांसाठी स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते.

महाराष्ट्रातील सर्वात पहिली गॅसदाहिनी असणारी अद्ययावत स्मशानभूमी माजीवाडा येथे उभारण्यात आली आहे. याच स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांना विधीवत पद्धतीने निरोप देण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी देखील उभारण्यात आली आहे. स्मशानभूमीत एपीसी तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेल्या चिमणीमुळे ७० टक्के प्रदूषण कमी होणार आहे. ३० मीटर लांबीची ही चिमणी असणार आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीच्या आवारात बसण्यासाठी अद्ययावत बैठक व्यवस्था करण्यात आली असून कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज नोंदणी कार्यालय बांधण्यात आले आहे.

महिला आणि पुरुषांकरिता सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ महादेवाचे सुंदर मंदिर बनविण्यात आले आहे. व्यक्तीला शेवटचा निरोप देताना त्या मृत व्यक्तीच्या देहाला आणि त्याच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.

ठाणे शहरात अंदाजित पाळीव प्राणी संख्या १० ते १५ हजार इतकी आहे. या प्राण्यांसाठी माजिवाडा येथे अद्ययावत स्मशानभूमी उभारण्यात आली असून तिचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. माजिवडा गाव येथे एक ५० किलो प्रति तास क्षमतेकरिता पीएनजी गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ही पहिली प्राण्यांची स्मशानभूमी आहे.

ठाण्यात आता पाळीव प्राणी स्मशानभूमी आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधली गेली आहे. आमच्या कुटुंबाचा खऱ्या अर्थाने भाग असलेले आमचे लाडके पाळीव प्राण्यांचे अंतिम संस्कार आता त्यांच्या हक्काच्या सन्मानाने पार पाडू शकतात. पाळीव प्राणी गमावणे ही एक कठीण वेळ असते आणि योग्य स्मशानभूमी शोधण्याचा त्रास दुःखात भर घालतो. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे, ठाणेकरांना अखेर ही अत्यंत आवश्यक सुविधा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया प्राणी पालक प्रमोद निंबाळकर यांनी दिली.