ठाणे : दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांनी कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प उभारला आहे की नाही, याची पाहाणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प उभारण्यात आलेला नसल्याचे आढळून येणाऱ्या गृहसंकुल आणि आस्थपनांना नोटीसा बजावण्यात येणार असून त्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतली नाहीतर, त्यांच्यावर कचरा नियमभंगाप्रमाणे कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याकरीता उपविधी तयार करण्यात येत असल्याने ठाण्यात गृहसंकुल, आस्थापनांवर कचरा नियमभंगाची दंडात्मक कारवाई होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थपनांनी आपल्याच आवाराच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, असा नियम घनकचरा अधिनियम २०१६ मध्ये आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिकेने यापुर्वी अनेकदा घेतला होता. या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटिसा पाठविल्या होत्या. या निर्णयास गृहसंकुलांनी विरोध केल्याने वाद रंगला होता. राजकीय मध्यस्थीनंतर पालिकेने पुढे काहीच केले नव्हते. त्यामुळे या नियमाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.
असे असतानाच, ठाणे महापालिकेने आता पुन्हा दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थपनांनी आपल्याच आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारावा, यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अशा गृहसंकुलांचा शोध घेण्यात येणार आहे.
शहरात एकूण ७४१ संकुले आणि आस्थपना दररोज शंभर किलो कचरा निर्माण करतात. त्यात ६७१ गृहसंकुले तर, ७० आस्थपनांचा समावेश आहे. याठिकाणी पालिकेची पथके जाऊन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला आहे की नाही, याची पाहाणी करणार आहेत. त्यात कचरा विल्हेवाट लावत नसलेली संकुले आणि आस्थपना आढळून आल्यानंतर त्यांना नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. या वृत्तास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दुजोरा देत कचरा विल्हेवाट लावत नसलेली संकुले आणि आस्थपनांना नोटीसा बजावणार असून त्यात त्यांना कचरा वर्गीकरण करण्याची प्रक्रीया सुरू करण्यास सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविधी तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.